भाजपमुळे उत्तर प्रदेश हा 'अपराध प्रदेश' झालाय- प्रियांका गांधी

कानपूरमध्ये विकास दुबेच्या टोळीने आठ पोलिसांना ठार मारले होते.

Updated: Jul 10, 2020, 04:36 PM IST
भाजपमुळे उत्तर प्रदेश हा 'अपराध प्रदेश' झालाय- प्रियांका गांधी title=

लखनऊ: कुख्यात गुंड विकास दुबे याच्या एन्काऊंटरनंतर आता उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजपमुळे उत्तर प्रदेशचा 'अपराध प्रदेश' झाला आहे, अशी टीका काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली. भाजपच्या काळात उत्तर प्रदेशात विकास दुबेसारख्या गुन्हेगारांचा दबदबा वाढला. राजकारण्यांकडून त्यांना अभय देण्यात आले. कानपूर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आल्याचे प्रियांका यांनी सांगितले. 

कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटर : आतापर्यंत नेमकं काय झालं?

विकास दुबे हा उत्तर प्रदेशातील नामचीन गुंड होता. त्याच्या नावावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांशी विकास दुबेचे संबंध होते. काही दिवसांपूर्वीच विकास दुबेची चौकशी करायला गेलेल्या पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये आठ पोलीस मारले गेले होते. यानंतर उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. 

दरम्यान, विकास दुबेची चौकशी झाली असती तर अनेक बडे राजकीय नेते अडचणीत आले असते, अशी चर्चा होती. त्यामुळेच न्यायालयात हजर करण्यापूर्वीच विकास दुबेचा एन्काउंटर झाल्याचीही कुजबुज आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सूचक ट्विट केले आहे.