Modi Surname Case Rahul Gandhi And BJP First Comment: सुप्रीम कोर्टाने काँग्रेसचे नेते राहुल गांधींना मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मोदी अडनाव प्रकरणामध्ये राहुल गांधींना गुजरात हायकोर्टाने सुनालेली शिक्षा रद्द केली आहे. या निकालामुळे राहुल गांधींची खासदारकी वाचली असून आता ते पुन्हा संसदेमध्ये जाऊ शकणार आहेत. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने, राहुल गांधींना या प्रकरणात सर्वाधिक म्हणजेच 2 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र ही शिक्षा का सुनावली हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. तसेच त्यांनी या प्रकरणाचा पूर्णपणे विचार केलेला दिसत नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या शिक्षेच्या निकालाला स्थगिती दिली. या निकालानंतर राहुल गांधींनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडूनही या निकालावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राहुल गांधींना दिलासा मिळाल्याची बातमी समोर आल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर दुसरीकडे राहुल गांधींना दिलासा मिळाल्यानंतर भाजपाकडूनही पहिली प्रतिक्रिया आळी आहे. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना दिलासा दिल्यानंतर संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी भाजपाचे खासदार सुब्रत पाठक यांनी संवाद साधला. "आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करतो. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. मात्र त्यांची या प्रकरणामधून मुक्तता केलेली नाही. राहुल गांधींनी पंतप्रधानांचा अपमान केला. एका विशेष जातीविरोधात त्यांनी अपशब्द वापरला. देशातील सर्वात मोठं न्यायालय हे जनतेचं न्यायालय आहे. 2024 मध्ये जनता राहुल गांधींना उत्तर देईल," असं पाठक यांनी म्हटलं आहे. भाजपाकडून या प्रकरणावर प्रथम प्रतिक्रिया देणाऱ्या नेत्यांपैकी पाठक एक आहेत.
सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतर राहुल गांधींनी ट्वीटरवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "काहीही झालं तरी माझी जबाबदारी कायम राहणार आहे. ती म्हणजे इंडिया या संकल्पेचं संरक्षण करणं," अशा अर्थाचं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.
Come what may, my duty remains the same.
Protect the idea of India.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 4, 2023
राहुल गांधींविरोधात मानहानीची याचिका दाखल करणारे भाजपाचे आमदार पूर्णेश मोदी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिलेली आहे. "आज सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली. आम्ही कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत करतो. आम्ही आमची न्यायालयीन लढाई अशीच सुरु ठेऊ," असं पूर्णेश मोदींनी म्हटलं आहे.
सूरतमधल्या सत्र न्यायालयाने 23 मार्च 2023 रोजी राहुल गांधींना गुन्हेगारी प्रकरणाl मानहानीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलं होतं. या प्रकरणात राहुल यांनी 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळून लावल्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. 2 वर्षांची शिक्षा झाल्याने राहुल गांधींविरोधात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुप्रीम कोर्टाच्या एका जुन्या निर्णयानुसार कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली होती.
राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलार येथे 13 एप्रिल 2019 ला एका प्रचारसभेत मोदी असा उल्लेख करत एक विधान केलं होतं. "नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव सारखंच का आहे? सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं?" असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. राहुल गांधींच्या या विधानाविरोधात भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात कलम 499, 500 अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. राहुल गांधी यांनी सर्व मोदी चोर म्हणत संपूर्ण समाजाचा अपमान केला असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं.