Airbags संदर्भात सुप्रीम कोर्टाचा आदेश, जाणून घ्या कोर्टाने काय म्हटलंय

कंपनीने आपल्या ग्राहकांचा विश्वास घात करायला नको. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कारबाबत हा निर्णय घेतला.

Updated: Apr 23, 2022, 07:35 PM IST
Airbags संदर्भात सुप्रीम कोर्टाचा आदेश, जाणून घ्या कोर्टाने काय म्हटलंय title=

मुंबई : आपल्याला माहित आहे की, एअरबॅग हे कारचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. गाडीच्या अपघाताच्यावेळी एअरबॅगमुळे अनेकांचे प्राण वाचण्याची शक्यता आहे. ज्यामुळे प्रत्येक कारसाठी दोन एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आले आहेत. आता एअरबॅग्जबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ज्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. आपण ग्राहक म्हणून गाडी विकत घेताना कंपनीवर विश्वास ठेवून कार विकत घेतो. मग कंपनीने आपल्या ग्राहकांचा विश्वास घात करायला नको. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कारबाबत हा निर्णय घेतला.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय?

अपघातात एअरबॅगने जर काम केलं नसेल किंवा अपघाता दरम्यान जर एअरबॅग ओपन झाली नाही, एक तर कंपनीला त्याचे नुकसान भरावे लागेल, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

अशाच एका प्रकरणात न्यायालयाने कार निर्माता कंपनी ह्युंदाईला, अपघातात झालेल्या शैलेंद्र भटनागरला 3 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यास सांगितले.

ही घटना 2017 मधील आहे. शैलेंद्र भटनागर यांनी ऑगस्ट 2015 मध्ये ह्युंदाईची क्रेटा कार खरेदी केली होती. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांच्या कारला अपघात झाला. ज्यानंतर भटनागर यांनी ग्राहक मंचात याचिका दाखल करून सांगितले की, क्रेटामधील सुरक्षा वैशिष्ट्ये लक्षात घेऊन मी ही कार खरेदी केली आहे. मात्र, अपघातादरम्यान एअरबॅगने काम केले नाही, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.

ग्राहक मंचाने यापूर्वीच भटनागरच्या बाजूने निकाल दिला होता, त्याला ह्युंदाईने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

त्यावेळी न्यायमूर्ती विनीत सरन आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

खंडपीठाने कार कंपनीला वाहन बदलण्याचे आदेश दिले. तेव्हा कंपनीच्या वकिलाने युक्तीवाद करत, समोरून जोरात धडक दिल्याशिवाय एअरबॅग काम करत नाही असे कोर्टाला सांगितले.

त्यावर न्यायालयाने म्हटले की, ग्राहक हे भौतिकशास्त्रातील तज्ञ नाहीत, जे अपघाताच्या वेळी वेग आणि फोर्स मोजू शकतील.

१ जानेवारी २०२२ पासून दोन एअरबॅग आवश्यक

प्रवाशांच्या सुरक्षेबाबत भाजप सरकार गंभीर आहे. जुलै 2019 मध्ये सर्व कारसाठी ड्रायव्हर साइड एअरबॅग अनिवार्य करण्यात आले होते. नंतर 1 जानेवारी 2022 पासून सह-प्रवासीसाठी देखील एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत. त्यानंतर प्रत्येक कारसाठी दोन एअरबॅग आता कंपन्यांसाठी अनिवार्य आहे.

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले होते की, आता आवश्यक 6 एअरबॅग बनवण्याची आमची तयारी आहे. आठ आसनी वाहनांसाठी आवश्यक सहा एअरबॅग तयार करण्याची तयारी सुरू आहे.