Bhojpali Baba: रामललाच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त राम मंदिराचे काम जोरात सुरू आहे. 22 जानेवारी 2024 रोजी भव्य सोहळ्यात रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. राम मंदिर लवकरात लवकर बनावे यासाठी देशभरातील हजारो राम भक्तांनी वेगवेगळे नवस केले होते. आता राम मंदिराचे काम पूर्णत्वास येत असल्याने त्यांचे हे नवस पूर्ण होत आहे. रामललाचे अनेक अनोखे भक्त तुम्ही पाहिले असतील, पण असाच एक भक्त आहे. या रामभक्ताने 31 वर्षांनंतर आपला अनोखा संकल्प पूर्ण केला आहे. रामललाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी त्यांना आमंत्रण पाठवण्यात आले असून ते या महत्त्वाच्या क्षणाची तयारी करत आहेत.
भोजपाली बाबा असे या अनोख्या भक्ताचे नाव असून त्यांचे खरे नाव रवींद्र गुप्ता आहे. त्यांनी 1992 साली अनोखा संकल्प केला. तेव्हा ते 21 वर्षांचे तरुण होते आणि ते राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येला गेले होते. राम मंदिर निर्माण होईपर्यंत लग्न करणार नाही, अशी शपथ त्यांनी यावेळी घेतली होती.
मी माझे आयुष्य राम मंदिरासाठी समर्पित केले आहे. जेव्हा मी घरातून निघून आलो तेव्हा माझी आई असह्य रडत होती, पण तिचा अढळ विश्वास कमी झाला नाही, असे भोजपाली बाबा सांगतात. 1992 मध्ये राममंदिर उभारणीच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला होता. सध्या ते बैरागी आणि मंदिराचे पुजारी म्हणून उदरनिर्वाह करत आहेत. 52 वर्षीय भोजपाली बाबा हे बैतूलच्या मिलनपूर गावातील भैरवनाथ मंदिराचे पुजारी आहेत.
भोजपाली बाबांनी चांगले शिक्षण घेतले आहे. त्यांनी तत्त्वज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असून कायद्याचेही शिक्षण घेतले आहे. त्यांनी उच्च न्यायालयात वकिलीही केली. दरम्यान वडिलांच्या निधनानंतर ते घरी परतले नाहीत.
62 वर्षांचे नेमाराम प्रजापतीदेखील असेच रामभक्त आहेत. जे 'राम रथ' सायकलवरून अहमदाबादहून अयोध्येला जात आहे. अयोध्येत राम मंदिराच्या मागणीसाठी नेमाराम गेल्या 20 वर्षांपासून अनवाणी सायकलवरून प्रवास करत आहेत. अहमदाबाद ते अयोध्या या प्रवासात नेमाराम जयपूरमधून जात असताना ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही पोहोचले. मात्र सीएम भजनलाल शर्मा दिल्लीत असल्याने नेमाराम यांची भेट होऊ शकली नाही. यानंतर नेमाराम यांनी भजनलाल शर्मा आणि त्यांच्या सरकारला सुशासनासाठी आशीर्वाद दिला. त्यांनी आपल्या सायकलला 'राम रथ' असे नाव दिले आहे.