नवी दिल्ली : एल्गार परिषद प्रकरणी पाचही जणांची नजरकैद कायम ठेवण्यात आलीय. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवलाय. निकाल येईपर्यंत आरोपी नजरकैदेत राहतील, असं कोर्टानं म्हटलंय. येत्या सोमवारपर्यंत सर्वांनी आपली बाजू लिखित स्वरुपात कोर्टासमोर मांडण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत. आरोपी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआर रद्द व्हावी की पोलिसांची चौकशी सुरू राहावी, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून एक मोठा खुलासा करण्यात आला. राज्य सरकारचे वकील तुषार मेहता यांनी आपली बाजू मांडताना प्रकाश चेतन आणि साईबाबा हा व्यक्ती एकच असल्याचं म्हटलंय. त्याला हिंदी या भाषेचं केवळ ज्ञान नाही तर तो या भाषेत भाषणंही ठोकतो, असंही मेहता यांनी कोर्टात म्हटलं.
महाराष्ट्र सरकारनं याचाही खुलासा केलाय की, प्रकाश नावानं लिहिण्यात आलेल्या चिठ्यांमध्ये षडयंत्रांचा उल्लेख आहे. याशिवाय ERB मिटिंग ईस्टर्न रीजनल ब्युरोच्या बैठकीचाही यात उल्लेख आहे. या कागदपत्रांत अशाही काही गंभीर गोष्टींचा उल्लेख आहे, ज्या गोष्टी कोर्टात जाहीररित्या बोलण्यायोग्य नाहीत... आरोपींच्या या पत्रांत कोड भाषेचा वापर करण्यात आलाय, असंही मेहता यांनी कोर्टासमोर म्हटलंय.