पोलिसांनी विचारलं, 'तुमच्या घरात फुले-आंबेडकरांचे फोटो का, देवतांचे फोटो का नाहीत?'

'पोलीस पत्नीला 'क्रूर आणि मूर्ख प्रश्न' विचारत होते'

Updated: Aug 30, 2018, 10:13 AM IST
पोलिसांनी विचारलं, 'तुमच्या घरात फुले-आंबेडकरांचे फोटो का, देवतांचे फोटो का नाहीत?' title=

नवी दिल्ली : भीमा - कोरेगाव आणि एल्गार परिषदेच्या चौकशीविषयी धक्कादायक माहिती समोर येतेय. या प्रकरणात पोलिसांनी मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील वरवरा राव यांची मुलगी पवाना हिचीही चौकशी केली. यावेळी, पोलिसांनी आपली सीमारेषा ओलांडली. 'तुमचे पती दलित आहे, त्यामुळे ते कोणत्याही परंपरेचं पालन करत नाहीत... परंतु, तुम्ही एक ब्राह्मण आहात, मग तुम्ही कोणतेही दागिने किंवा कुंकू का लावत नाहीत? तुमचा पेहराव एक पारंपरिक पत्नीसारखा का नाही? एका मुलीनंही पित्यासारखंच असावं का?' असे काही प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांनी पवानाला केलेत. 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका बातमीत ही माहिती दिलीय.

पवाना हैदराबादमध्ये इंग्लिश अॅन्ड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी (EFLU) च्या सांस्कृतिक अभ्यास विभागाचे प्रमुख सत्यनारायण यांची पत्नी आहे. पवानाचे वडील वरवरा राव यांना पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या बैठकीत सहभागी झाल्यानं माओवादी लिंक असल्याच्या संशयाखाली चौकशीसाठी अटक केलीय.

पवानाचे पती सत्यनारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी आणि तेलंगानाच्या स्पेशल इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली... हा एक 'त्रासदायक आणि अपमानजनक' अनुभव होता. कारण पोलीस त्यांच्या पत्नीला 'क्रूर आणि मूर्ख प्रश्न' विचारत होते. 

'अगोदर त्यांनी सांगितलं की ते वरवरा राव यांना शोधत आहे... जेव्हा ते त्यांना सापडले नाहीत तेव्हा त्यांनी बुकशेल्फ, कपाट उघडून तपासणी केली. यावेळी त्यांनी आपण माओवाद्यांशी असलेल्या लिंकची तपासणी करत आहोत, असं सांगितलं. पुणे आणि तेलंगाना पोलिसांची 20 जणांची टीम माझ्या घरात सकाळी 8.30 पासून 5.30 वाजेपर्यंत होते... आणि त्यांनी सर्व अस्ताव्यस्त करून टाकलं...' असं सत्यनारायण यांनी म्हटलं. 

इतक्यावरच ते थांबले नाहीत... तर त्यांनी तुमच्या घरात एवढे पुस्तकं का आहेत? तुम्ही हे सगळे पुस्तकं वाचलीत का? एवढी पुस्तकं का विकत घेतलीत? एवढी पुस्तकं का वाचता? तुम्ही माओ आणि मार्क्सवर पुस्तकं का वाचत आहात? तुमच्याकडे चीन प्रकाशित पुस्तकं का आहेत? तुमच्या घरात फुले आणि आंबेडकरांचे फोटो का, देवतांचे फोटो का नाहीत? असेही असंबंध प्रश्न विचारल्याचं सत्यनारायण यांनी म्हटलंय.