Bengaluru Techie Video: उत्तर प्रदेशमधील एका 34 वर्षीय व्यक्तीने बंगळुरुमध्ये राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीचं नाव अतुल सुभाष असं असून घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन त्याने स्वत:चं आयुष्य संपवलं. हा सारा प्रकार सोमवारी घडला. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात धक्कादायक खुलासा करताना, मयत अतुलने आत्महत्येपूर्वी लिहिलेली 24 पानांची चिठ्ठी सापडल्याचं सांगितलं आहे. यामध्ये अतुलने पत्नी आणि तिच्या नातेवाईकांच्या छळाला कंटाळून आपण स्वत:ला संपवत आहोत, असं म्हटलं आहे.
आत्महत्येपूर्वीचं अतुलचं 90 मिनिटांचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही सापडलं आहे. या व्हिडीओमध्ये अतुलने त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना पत्नीकडून तसेच तिच्या घरच्यांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. त्याने मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. जोपर्यंत मला छळणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत आपली अस्थींचं विसर्जन करु नये अशी शेवटची इच्छा अतुलने या व्हिडीओमध्ये व्यक्त केली आहे. आपल्याला न्याय मिळाला नाही आणि आपल्याला छळणाऱ्यांना शिक्षा झाली नाही तर माझ्या अस्थी न्यायालयाबाहेरील कोर्टामध्ये विसर्जित कराव्यात असंही अतुलने या व्हिडीओत म्हटलं आहे. न्याय मिळवण्यासाठी कोणती किंमत मोजावी लागते हे या कृतीमधून स्पष्ट होईल, असं अतुलने मृत्यूपूर्वी म्हटलं आहे.
अतुलने आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये कशाप्रकारे त्याच्यावर खोटे आरोप करुन त्याला छळण्यात आलं याबद्दल सांगितलं आहे. तसेच आपल्या काही शेवटच्या इच्छा सांगताना, आपल्या मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी त्यांचं संगोपन आपल्या पालकांनी करावं असंही अतुलने म्हटलं आहे. आपल्या पत्नीनेच तिच्याकडे मुलांच्या संगोपनासाठी पैसे नसल्याचं कबुल केल्याचं अतुलने सांगितलं आहे. म्हणूनच तिने मुलांचा ताबा माझ्या पालकांकडे आणि माझ्या भावाकडे द्यावा. ते त्यांची उत्तम काळजी घेतील असं अतुलने म्हटलं आहे. तसेच आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्या अस्थींचं विसर्जन करु नये असंही अतुलने या व्हिडीओत म्हटलं आहे. मात्र आपल्याला न्याय नाही मिळाला तर आपल्या अस्थी निषेध म्हणून न्यायालयाबाहेरील गटारामध्ये विसर्जित कराव्यात असंही त्याने शेवटची इच्छा व्यक्त करताना म्हटलं आहे.
माझ्या मृतदेहाजवळ माझी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांना येऊ देऊ नये, असंही अतुलने शेवटच्या व्हिडीओत म्हटलं आहे. अतुलने त्याच्या घरच्यांना कॅमेरा किंवा भेटल्याची पुरावा सोबत ठेवता येईल अशी तरतूद केल्याशिवाय माझ्या पत्नीला किंवा तिच्या कुटुंबियांना भेटू नका असा सल्लाही आत्महत्येपूर्वी दिला आहे. गरज पडली तर मला छळणाऱ्या पत्नीला आणि तिच्या नातेवाईकांना सार्वजनिक ठिकाणीच भेटा, असा सल्लाही अतुलने दिला आहे. या प्रकरणामधील न्यायाधिशांविरोधातही खटला चालवला जावा अशी मागणी अतुलने केली आहे. तसेच या प्रकरणात माधव नावाच्या व्यक्तीची चौकशी करण्यात यावी असंही अतुलने म्हटलं आहे. या सर्व लोकांनी पत्नीच्या मदतीने आपल्याला अडकवल्याचा आरोप अतुलने केला आहे. न्यायव्यवस्थेबद्दल अतुलला असणारी चिड त्याच्या शेवटच्या व्हिडीओमधून दिसून येत आहे. आपण घेत असलेल्या या टोकाच्या निर्णयाचा पालकांना होणारा त्रास लक्षात घेत त्याने त्यांची माफीही मागितली आहे.
This was Atul Subhash
He left for Shiva’s abode
Watch it and marry carefully
ॐ शांति
pic.twitter.com/uKKgev85ej— Kreately.in (@KreatelyMedia) December 10, 2024
बंगळुरुमधील मंजूनाथ लेआऊट परिसरामध्ये अतुल भाड्याच्या घरात राहत होता. मराठाहल्ली पोलीस स्टेशनअंतर्गत हा परिसर येतो. पोलिसांनी वैवाहिक मनस्थापातून अतुलने आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. अतुलच्या पत्नीने त्याच्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये खटला दाखल केला होता. अतुलने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ईमेलवरुन तसेच व्हॉट्सअपवरुन तो ज्या एनजीओची मदत घेत होता त्यांना पाठवली आहे. काही वरिष्ठ न्यायालयांमधील न्यायाधीशांनी जाणूनबुजून आपल्याला न्याय दिला नाही. त्यासाठी आपण त्यांच्याविरोधात खटला चालवू इच्छितो असंही अतुलने आपल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वीच्या व्हिडीओमध्ये शेवटी अतुलने एक कागद ठेवला असून त्यामध्ये , 'न्याय अजून झालेला नाही' असं लिहिलेलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.