Walmik Karad MCOCA: बीडच्या केज तालुक्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच त्याच्यावर मकोकाही लावण्यात आला आहे. दरम्यान कोर्टात नेमकं काय घडलं याची माहिती वाल्मिक कराडचे (Walmik Karad) वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.
"आज कोर्टात युक्तिवाद झाला असता 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. पोलीस कोठडी मागताना त्यांनी 10 मुद्दे मांडले होते. त्यांच्या आधारावर कोठडी द्यावी अशी मागणी होती. 31 डिसेंबरला 15 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. पण यावेळी त्यांनी तेच 10 मुद्दे परत मांडले. त्यामुळे कोर्टाने दोन्ही सरकारी वकील आणि आमचा युक्तिवाद ऐकला. पोलीस कोठडीचा अर्ज फेटाळला असून मॅजिस्ट्रेट कोठडी दिली आहे," अशी माहिती त्यांनी दिली आहे.
"आज फक्त खंडणीबाबत सुनावणी झाली आहे. आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यात तपास करायचा आहे असं त्यांनी सांगितलं. वाल्मिक कराडचा सहभाग निष्पन्न झालेला नाही असा युक्तिवाद आम्ही केला आहे. आम्हाला गुन्ह्याचा तपास करायचा आहे, अॅट्रॉसिटीह इतर तीन गुन्ह्यांचा संदर्भ होता. त्याचे काही साक्षीदार आहेत का? कुठे संपत्ती घेतली आहे का? राज्यात, देशात आहे का? यासंबंधी तपास करायचा आहे असे मुद्दे त्यांनी मांडलं होते, पण कोर्टाने हे मुद्दे ग्राह्य धरले नाहीत," असंही त्यांनी सांगितलं. हत्येच्या कटात आरोपी करण्यात आलेलं नाही अशी माहितीही त्यांनी दिली.
"पहिला 40 दिवसांचा तपास असतो त्यात 15 दिवस तुम्ही पोलीस कोठडी मागू शकता. आम्ही यावेळी कर्नाटक हायकोर्टाचा दाखला दिला. 15 दिवसांत पूर्ण तपास झाला असल्याने पुन्हा कोठडी मागण्याची मागणी ग्राह्य नाही असा युक्तिवाद केला जो मान्य झाला," असंही ते म्हणाले.