मुंबई : कोरोनाच्या काळात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालीये. सायबर अटॅकर्स आता कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरू केली आहे. या प्रकरणांमध्ये, गृह मंत्रालयाने (MHA) सायबर गुन्ह्यांबाबत एक गाईडलाईन जारी केला आहे. देशात नवीन स्ट्रेनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत, सायबर ठग ओमायक्रॉन प्रकाराच्या मोफत चाचणीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहेत.
गृह मंत्रालयाच्या सायबर आणि माहिती सुरक्षा विभागाने एक सूचना जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, 'आरोग्य संकटावर लक्ष केंद्रित केल्यामुळे सायबर सुरक्षेत दुर्लक्ष केले जात आहे. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी सायबर गुन्हेगार नेहमीच नवनवीन मार्ग वापरत असतात. आजकाल Omicron प्रकाराबाबत सायबर गुन्हे वेगाने वाढत आहेत. त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता सायबर गुन्हेगार भोळ्या लोकांना फसवण्यासाठी विविध डावपेच अवलंबत आहेत.
गृह मंत्रालयाने पुढे माहिती दिली की ओमायक्रॉनची आरटीपीसीआर चाचणीशी संबंधित ईमेल पाठवतात. यामध्ये लोकांचा डेटा चोरणाऱ्या लिंक्स आणि फाइल्स आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सरकारी आणि खाजगी आरोग्य सेवांच्या नावाचा वापर करून जनतेची फसवणूक केली जात आहे. RT-PCR चाचणीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून, लोकांना ठगांनी तयार केलेल्या बनावट वेबसाइटवर नेले जाते, जी सरकारी/खासगी आरोग्य सेवांच्या वेबसाइटसारखीच आहे.
सायबर गुन्हेगार लोकांची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील मिळवतात आणि लोकांची फसवणूक करतात. वेबसाइट खरी आहे की बनावट हे जाणून घेण्यासाठी सरकारने लोकांना डोमेन नाव आणि URL तपासण्याचा सल्ला दिला आहे. अशा कोणत्याही घटनेची cybercrime.gov.in पोर्टलवर तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.