Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडीओ तुमचं मनोरंजन करणारे असतात, तर काही व्हिडीओ तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतात. त्यातच प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला असल्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करुन तो सोशल मीडियावर शेअर करण्याचा प्रयत्न असतो. पण यामुळे अनेक अशा घटना उघड होतात, ज्या कदाचित नेहमीच गुदस्त्यात राहिल्या असत्या. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत केशकर्तनकार ग्राहकाचं फेस मसाज करताना थुकीचा वापर करत असल्याचं दिसत आहे. ही गलिच्छ घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, स्वत: केशकर्तनकार युसूफनेच रेकॉर्ड केली आहे. व्हिडीओत ग्राहक चेहऱ्यावर क्रीम लावण्यात आली असल्याने डोळे बंद करुन बसलेला दिसत आहे. त्यावेळी युसूफ हातात थुंकतो आणि तीच थूक ग्राहकाच्या चेहऱ्यावर लावतो. उत्तर प्रदेशच्या कनौज येथे ही घटना घ़डली आहे.
ग्राहकाचे डोळे बंद असल्याचा युसूफ फायदा उचलतो आणि मसाज करताना ती थुकीही त्याच्या चेहऱ्यावर लावतो. ग्राहकाला मात्र डोळे बंद असल्याने काहीच समजत नाही. हे कृत्य केल्यानंतर युसूफ व्हिडीओत अंगठा दाखवतो. दुसरीकडे ग्राहक ज्याला आपल्यासोबत काय झालं आहे याची कल्पनाच नसते तोदेखील डोळे उघडून हसतो आणि अंगठा दाखवतो.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) कार्यकर्त्यांनी युसूफविरोधात आंदोलन केलं आणि कडक कारवाईची मागणी केली. दुसरीकडे युसूफ या घटनेनंतर फरार आहे.
पोलिस अधीक्षक (एसपी) अमित कुमार यांनी सांगितलं आहे की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे. त्याची कृती चुकीच्या हेतूने होती असंही ते म्हणाले आहेत. "एक व्हायरल व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला ज्यामध्ये केशकर्तनकार एका व्यक्तीला चेहऱ्याचा मसाज देत आहे. त्यादरम्यान त्याने थुंकून ग्राहकाच्या चेहऱ्यावर मसाज केला. तो थुंकला तेव्हा ग्राहकाचे डोळे बंद होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई केली जाईल," असं पोलीस अधीक्षक म्हणाले.
अशी घटना पहिल्यांदाच समोर आलेली नाही. जूनमध्ये, लखनौमधील एका सलूनमध्ये ग्राहकाच्या चेहऱ्यावर थुंकून मसाज करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर एका केशकर्तनाकाराला अटक करण्यात आली होती.