Bangladeshi Coimbatore Airport: एका बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकाला कोएम्बतूर विमानतळावर (Coimbatore Airport) सोमवारी अटक करण्यात आली. भारतीय इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला भारताचं राष्ट्रगीत (Indian National Anthem) गायला सांगितलं. मात्र त्याला भारताचं राष्ट्रगीत म्हणता आलं नाही. यावरुनच ही व्यक्ती परदेशी असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याला अटक करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी शारजाहवरुन आलेल्या जी. अन्वर हुसैन (27) याला चौकशीसाठी थांबवलं. त्याला अधिकाऱ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत. या बंगलादेशी नागरिकाकडे भारतीय पासपोर्ट आणि आधारकार्डही होतं. अन्वर हुसैन मूळाच बंगलादेशमधील बालमपूरचा रहिवाशी आहे. तो शारजाहमधून एअर अरेबियाच्या विमानाने कोएम्बतूर विमानतळावर आला होता. त्याच्याकडे प्राथमिक चौकशीमध्ये पासपोर्टसंदर्भात विचारणा करण्यात आली असता त्याने पासपोर्ट दाखवला.
पासपोर्टवरील माहितीच्या आधारे अन्वर कोलकात्यामधील रहिवाशी असल्याचं समजलं. मात्र इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कोलकात्याऐवजी कोएम्बतूरमध्ये उतरण्यासंदर्भातील प्रश्न विचारले. अन्वरने असं का केलं हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याला काही प्रश्न विचारले. मात्र कोलकात्याऐवजी कोएम्बतूरला का आलो हे अन्वरला नीट सांगता आलं नाही.
अन्वरची अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली असता तो परस्पर विरोधी उत्तरं देऊ लागला. त्याने आपलं आधारकार्ड आणि जन्माचा दाखलाही दाखवला. या दोन्ही कागदपत्रांवर भारत सरकारचे ठसे आणि सरकारी कागदपत्रं असल्याचं दर्शवणाऱ्या सर्व गोष्टी होत्या. मात्र त्याचवेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या टीममधील एम. कृष्णश्री यांनी अन्वरला भारताचं राष्ट्रगीत ऐकवं असं सांगितलं. मात्र अन्वरला राष्ट्रगीत म्हणता आळं नाही. यानंतर त्यानेच आपण मूळचे भारतीय नसून बंगलादेशी असल्याची कबुली अधिकाऱ्यांना दिली.
अधिकाऱ्यांनी अन्वरला पिलामेडू पोलीस स्थानकातील पोलिसांकडे सुपूर्द केलं. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परदेशी नागरिकांच्या घुसखोरीसंदर्भातील कायद्याबरोबरच पासपोर्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्यांदा 2018 मध्ये अन्वर तामिळनाडूमधील तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहरात आला होता. त्यानंतर त्याने तिथे 2020 पर्यंत खोट्या माहितीच्या आधारे काम केलं. त्यानंतर काही एजंटची त्याने भेट घेतली. खोटा जन्माचा दाखला त्याने तयार करुन घेतला. त्याच्या मदतीनेच त्याने आधार कार्ड आणि भारतीय पासपोर्ट बनवला.
हे कागदपत्रं तयार केल्यानंतर अन्वर संयुक्त अरब अमिरातीमध्ये गेला. तिथे त्याने टेलर म्हणून काम केलं. सोमवारी तो पुन्हा अविनाशीमध्ये कायमचं स्थायिक होण्याच्या उद्देशाने भारतात परतला. मात्र अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडलं. या प्रकरणामध्ये गुप्तचर यंत्रणांनीही तपास सुरु केला आहे. अन्वर हुसैनला मंगळवारी एका स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्याला चेन्नईमधील पुझल केंद्रीय कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे.