Manali Tourist Clash Viral Video: हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) मनालीमध्ये (Manali) सध्या तुफान बर्फवृष्टी (Snowfall) होत आहे. याचमुळे मोठ्या संख्येनं पर्यटक मनालीमधील (Manali Snowfall) या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मनालीमध्ये दाखल झाले आहेत. मात्र येथील सोलांग नालापासून पुढे जाण्याची परवानगी पर्यटकांना देण्यात आलेली नाही. पर्यटकांची लक्ष्मण रेषा असलेल्या सोलांग नाला येथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये पर्यटकांमधील दोन गट एकमेकांशी हाणामारी (Road Rage) करताना दिसत आहेत. हे प्रकरण रस्त्यावरील हाणामारीचं असून या प्रकरणाबद्दल पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, मनालीमधील सोलांगवॅली नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरामधील हा व्हिडीओ आहे. यामध्ये पर्यटकांचे दोन गट एकमेकांना हाणामारी करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये बर्फवृष्टी होत असतानाच दोन गट रस्त्यावर दुचाकी वाहनांच्या आजूबाजूला भांडताना दिसत आहेत. दोन्ही बाजूकडील लोक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आहेत. तसेच दोन्हीकडील लोक एकमेकांना कानशीलातही लगावताना दिसत आहेत. तसेच एक तरुण चक्क बेसबॉल बॉटने समोरच्या व्यक्तीवर हल्ला करताना दिसतोय. तसेच हे सर्व तरुण मोठमोठ्याने एकमेकांना शिव्या देत आहेत.
मनाली पोलिसांना या मारहाणीसंदर्भात माहिती मिळली आहे. मात्र या प्रकरणामध्ये हाणामारी करणाऱ्या एकाही गटाने तक्रार नोंदवलेली नाही. त्यामुळे पोलीस या प्रकरणात मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत आहेत.
कौन सी बारिश ज्यादा दमदार लग रही है?
बर्फ या लात घूंसे?
मनाली में पार्किंग को लेकर ये बारिश हुई है।#Manalipic.twitter.com/VeJqHoHB6R
— Gaurav Agrawal (@GauravAgrawaal) January 25, 2023
हिमाचलमध्ये आजूबाजूच्या राज्यांबरोबरच भारतभरातून पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी दाखल होत आहेत. मनाली, शिमलामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणांहून अशाप्रकारच्या हाणामारीच्या बातम्या समोर येत आहेत. बर्फवृष्टी आणि वाढती पर्यटक संख्येचा विचार करता हिमाचल प्रदेश पोलिसांनी अनेक ठिकाणी निर्बंध लादले आहेत. अनेक रस्ते एका ठराविक मर्यादेपर्यंत पर्यटकांसाठी खुले ठेवण्यात आले आहेत. असा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होताना दिसत असून येथे छोट्या मोठ्या मुद्द्यांवरुन पर्यटकांमध्ये हाणामारी होण्याचं प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढल्याचं चित्र दिसत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची गस्त यापूर्वीच वाढवण्यात आली आहे.