साईबाबांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीने अखेर मागितली माफी, म्हणाले "मला माफ करा, माझ्याकडून..."

Dhirendra Shastri apology: साईबाबांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री (dhirendra krishna shastri) यांनी अखेर माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर माफीनामा जाहीर केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 5, 2023, 06:38 PM IST
साईबाबांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीने अखेर मागितली माफी, म्हणाले "मला माफ करा, माझ्याकडून..."  title=

Dhirendra Shastri apology over Sai Baba: बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री (dhirendra krishna shastri) यांनी साईबाबांबद्दल (Sai Baba) काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक विधान केलं होतं. कोणताही संत महापुरुष, युगपुरुष, असतो, पण देव नसतो. कोल्ह्याची कातडी घालून कोणीही सिंह बनू शकत नाही असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर संपूर्ण देशभरातील साईभक्तांकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता. धीरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्रात येऊन हे विधान केलं असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही त्यावर नाराजी जाहीर करत कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, अखेर धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर माफीनामा जाहीर केला आहे. 

धीरेंद्र शास्त्री यांनी काय म्हटलं होतं?

"शंकराचार्यांनी साईबाबांना देवतांचे स्थान दिलेले नाही. आपल्या धर्माचे प्रमुख असल्याने शंकराचार्यांनी सांगितलेली गोष्ट पाळणे हा प्रत्येक सनातनीचा धर्म आहे. कोणताही संत महापुरुष, युगपुरुष, असतो, पण देव नसतो. कोल्ह्याची कातडी घालून कोणीही सिंह बनू शकत नाही," असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते.

साईबाबांची पूजा करावी की नाही? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले होते की "आम्हाला कोणाच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही आहे. पण इतकं नक्की सांगेन की, साईबाबा हे संत किंवा फकीर असू शकतात पण देव असू शकत नाहीत".

माफीनाम्यात काय म्हटलं आहे?

धीरेंद्र शास्त्री यांनी ट्विटरला आपला माफीनामा जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की "मी नेहमीच संत आणि महापुरुषांचा आदर केला आहे. मी फक्त संदर्भत देत एक गोष्ट सांगत होतो. आता मी पाठी छत्री लावून मीच शंकराचार्य आहे असं तर सांगू शकत नाही ना...मी फक्त शंकराचार्य यांनी साईबाब संत, फकीर असू शकतात आणि लोकांची त्यांच्यावर आस्था आहे हे विधान केलं होतं याचा पुनरुच्चार केला. जर एखादी व्यक्ती एखाद्या संत, गुरुंना आपली आस्था, देव मानत असेल तर आमचा त्याला विरोध नाही. जर आमच्या एखाद्या शब्दाने एखाद्याच्या मनाला धक्का लागला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत".

 

आव्हाडांनी व्यक्त केला होता संताप

"जाहीर आमंत्रण! महाराष्ट्रात कोणालाही शिव्या द्या. छत्रपती शिवाजी महाराजांना द्या, जिजाऊ मातेला द्या, महात्मा गांधींना द्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना द्या, महात्मा फुलेंना द्या, क्रांतीज्योती सावित्री माईला द्या, छत्रपती शाहू महाराजांना द्या, साईबाबांना द्या. यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही याची खात्री आणि शाश्वती आहे. या लवकर या.  कुणालाही शिव्या घाला महापुरुषांना घाला, श्रद्धास्थानांना घाला. असं वातावरण परत मिळणार नाही," असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत व्यक्त केला होता.