जन्मतः या बाळाला आहेत सात दात

अहमदाबादमध्ये  जन्मतः एका बाळाला सात दात आहेत. 

Updated: Sep 1, 2017, 07:48 PM IST
जन्मतः या बाळाला आहेत सात दात title=
प्रातिनिधिक फोटो

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये  जन्मतः एका बाळाला सात दात आहेत. 

या घटनेमुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. अशी घटना पहिलीच असल्याने हे चमत्कारापेक्षा कमी नाही असे म्हटले जात आहे. बाळाचे सर्व दात नाजूक असल्याने ते काढून टाकण्यात आले आहेत.  

अहमदाबादमध्ये राहणा-या शर्मा कुटुंबात बाळ जन्माला आल्याची बातमी मिळताच आनंद साजरा होऊ लागला. पण नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सात दात असल्याचं कळताच कुटुंबियांसह डॉक्टरांनाही  आश्चर्याचा धक्का बसला.  नवमातेला स्तनपान करताना त्रास होत असल्याने बाळाचे दात काढून टाकले गेले.  शर्मा कुटुंबियांनी बालरोगतज्ञ डॉ निरव बेनानी आणि दंत चिकित्सक डॉ मीत रामात्री यांच्याशी संपर्क केला. दोन्ही डॉक्टरांनी दात काढून टाकण्याचा सल्ला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 

पालकांनी दात काढून टाकण्यासाठी सहमती दर्शवल्यानंतर बाळावर दोन शस्त्रक्रिया  करुन दात काढण्यात आले. या शस्त्रक्रियेच्या वेळेस बाळ अवघ्या एका महिन्याचं होतं. पहिल्या वेळेस बाळाला अॅनेस्थेशिया देऊन तीन दात काढण्यात आले, आणि दुस-या शस्त्रक्रियेच्या वेळेस उर्वरित दात काढून टाकण्यात आले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळावर शस्त्रक्रिया केली नसती तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती. बाळाचे सगळेच दात नाजूक असून ते हलत होते. यामुळे बाळाला जखम होण्याची शक्यता होती. तसंच दात अन्ननलिकेत अडण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती.