Ayodhya Ram Temple: 'त्यानंतरही नरेंद्र मोदी जिवंत असतील, तर...,' काँग्रेस नेत्याला शंका, भाजपा संतापली

काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी खरंच 11 दिवस उपवास ठेवला का? अशी विचारणा करत शंका व्यक्त केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 24, 2024, 12:59 PM IST
Ayodhya Ram Temple: 'त्यानंतरही नरेंद्र मोदी जिवंत असतील, तर...,' काँग्रेस नेत्याला शंका, भाजपा संतापली title=

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 दिवस उपवास ठेवला होता. प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं होतं. नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून त्यांनी धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली होती. नरेंद्र मोदींनी कठोर व्रत पाळत फक्त नारळपाणीचं सेवन केलं. पण काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी नरेंद्र मोदींनी खरंच 11 दिवस उपवास ठेवला का? अशी विचारणा करत शंका व्यक्त केली आहे. 

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वीरप्पा मोईली यांनी सांगितलं की, "मी डॉक्टरसह मॉर्निंग वॉकला गेलो असता त्याने मला एखादी व्यक्ती सलग 11 दिवस उपवास करत असल्यास जिवंत राहू शकणार नाही असं सांगितलं. जर नरेंद्र मोदी जिवंत आहेत, तर तो एक चमत्कारच आहे. त्यामुळे त्यांनी खरंच उपवास केला का याबाबत मला शंका आहे".

"जर त्यांनी उपवास न करता गर्भगृहात (राममंदिरात) प्रवेश केला असेल, तर ती जागा अपवित्र होते आणि त्या ठिकाणाहून शक्ती निर्माण होणार नाही," असंही ते म्हणाले.

11 दिवस जमिनीवर झोप, पोटासाठी फक्त नारळ पाणी अन्...; PM मोदींचा 11 दिवसांचा कठोर डाएट प्लॅन

 

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने आपल्याला एक साधन म्हणून निवडलं असून हे लक्षात घेऊनच 11 दिवसांचा विशेष धार्मिक कार्यक्रम हाती घेत असल्याचं पंतप्रधान म्हणाले होते. पंतप्रधान मोदी 11 दिवस 'यम नियम'चे पालन करणार असून, धर्मग्रंथात दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. दरम्यान प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी गोविंद देव गिरी महाराज यांच्या हातून नरेंद्र मोदींनी उपवास सोडला. 

वीरप्पा मोईली यांच्या विधानावर भाजपा नेत्यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. कर्नाटकचे भाजपा आमदार लहर सिंग सिरोया म्हणाले आहेत की, "वीरप्पा मोईली यांना प्रत्येजकण आपल्यासाऱखा खोटारडा आहे असं वाटतं. मोईली यांनी अयोध्या राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपोषणावर शंका व्यक्त केली आहे. देशाला सत्य माहित आहे".

"जर तुमची रामावर श्रद्धा असेल तर कठोर उपवास करुनही जिवंत राहू शकता. पण जर गांधी कुटुंबाच्या सुखासाठी झगडत असाल तर शक्य नाही. गांधी कुटुंबाला खूश करण्याचा प्रयत्न करत असले तरी मोईली यांना काँग्रेस तिकीट देणार आहे," असा टोलाही त्यांनी लगावला आहे.