BTech Pani Puri Wali: ग्रॅज्युएट वडापाव, एमबीए चहावाला असे अनेक तरुण व्यावसायिक आपल्याला माहिती झाले आहेत. यांनी आपल्या कल्पकतेमुळे सोशल मीडियात चांगलीच प्रसिद्धी मिळवली. उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच कल्पक विचार करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देत असतात. ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वेगळं काहीतरी करणाऱ्यांना प्रसिद्धी देतात. त्यांची अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ज्यात 'बीटेक पाणीपुरी वाली' महिंद्रा थारवर आपला स्टॉल ओढताना दिसतेय.
आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बीटेक पाणीपुरी वालीचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच या तरुणीचे तोंडभरुन कौतुक करण्यासही ते विसरले नाहीत. पाणीपुरी वाली करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. 'लोकांना अशक्य शोधण्यात मदत' करण्याच्या त्यांच्या अद्वितीय क्षमतेवर आनंद महिंद्रांनी प्रकाश टाकला. यासोबत ऑफ-रोड वाहनांबद्दल तरुणीचे कौतुकही केले.
दिल्लीतील 22 वर्षीय उद्योजक तापसी उपाध्याय ही शहरात 'बीटेक पाणीपुरी वाली' म्हणून प्रसिद्ध आहे. या तरुण उद्योजिकेचा पाणीपुरीचा स्टॉल पूर्वी टिळक नगरमध्ये होता. पण आता संपूर्ण भारतात 40 हून अधिक स्टॉल्स असल्याचे ती सांगते. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, 'बीटेक पाणीपुरीवाली' तापसी सुरुवातीला स्टॉलसाठी स्कुटीचा वापर करायची यानंतर तिने बाईकचा उपयोग केला. दरम्यान आता ती थारने स्टॉल ओढून नेते.'
What are off-road vehicles meant to do?
Help people go places they haven’t been able to before..
Help people explore the impossible..
And in particular we want OUR cars to help people Rise & live their dreams..
Now you know why I love this video…. pic.twitter.com/s96PU543jT
— anand mahindra (@anandmahindra) January 23, 2024
ऑफ-रोड वाहने काय करण्यासाठी बनविली जातात? लोकांना ज्या ठिकाणी जाणे अशक्य वाटते तिथे जाण्यास मदत करतात. लोकांना अशक्य एक्सप्लोर करण्यात मदत करतात. आम्हाला आमच्या कारच्या माध्यमातून लोकांना पुढे जाण्यास आणि त्यांची स्वप्ने जगण्यास मदत करायची आहे. मला हा व्हिडिओ का आवडला, हे आता तुम्हाला समजले असेल, असेही ते पुढे म्हणाले.
आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एक्स युजर्सनीदेखील तिच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रमाने महत्त्वाचे टप्पे गाठले जाऊ शकतात, असे एका युजरने म्हटले.
अप्रतिम व्हिडिओ! प्रत्येकाने तो पाहावा, अशी प्रतिक्रिया अनेकजण देत आहेत. मला आनंद महिंद्रा यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळावी ही माझी मनापासून इच्छा असल्याची प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तसेच हा खरोखर प्रेरणादायी व्हिडिओ असल्याचे अनेकजण म्हणत आहेत.