अयोध्या: उत्तर भारतीयांनी मुंबईतून हाकलणारे लोक श्रीरामाची सेवा काय करणार, अशी टीका भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केली. ते रविवारी अयोध्येत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली. सुरेंद्र सिंह यांनी म्हटले की, शिवसेना राम मंदिराचा मुद्दा हातात घेऊच कशी शकते? ज्या लोकांनी उत्तर भारतीयांना मारले आणि हाकलले त्यांच्यात साधी माणुसकीही नाही. ते श्रीरामाची सेवा कशी काय करु शकतात, असा सवाल सुरेंद्र सिंह यांनी विचारला.
तत्पूर्वी रविवारी सकाळी उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमीवर जाऊन सहकुटुंब रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. सुरुवातीला त्यांनी अयोध्या दौरा यशस्वी झाल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकार, पोलीस प्रशासन, अयोध्यावासीय आणि साधु-संतांचे आभार मानले. अयोध्या दौऱ्यामागे आमचा कुठलाही छुपा अजेंडा नाही. देशातील समस्त हिंदूंच्या भावना घेऊन मी अयोध्येत आलो आहे. राम मंदिर कधी बांधणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे, असे ते म्हणाले.
राम मंदिराचं निर्माण होणारच, पण या सरकारनं मंदिर बांधलं नाही तर भविष्यात हे सरकार बनणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी भाजप सरकारला दिला.
विहिंपची जय्यत तयारी
रविवारी होणाऱ्या धर्मसभेसाठी ८० फूट लांब व्यासपीठ तयार करण्यात आले होते. या व्यासपीठावर जवळपास दीडशेहून अधिक साधू, संत आणि महंत विराजमान होणारयत. इथं येणाऱ्या रामभक्तांची संख्या दोन लाखांच्या आसपास असेल असा अंदाज विहिंपनं वर्तवलाय. त्यानुसार या धर्मसभा स्थळावर व्यवस्था करण्यात आलीय.