मुंबई : बॅंकींग क्षेत्रातही दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बॅंकांकडून नवनवीन घोषणा केल्या जात आहेत. खासकरून गृहकर्जाच्या क्षेत्रात ही स्पर्धा अधिक बघायला मिळते. यानुसार आघाडीच्या अॅक्सिस बँकेने आपल्या गृहकर्ज ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
अॅक्सिस बँकेने गृहकर्जदारांना तब्बल १२ मासिक हप्ते माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. या घोषणेचा लाभ घेण्यासाठी तुमचं गृहकर्ज ३० लाखांवर असायला हवं. इतकंच नाहीतर या कर्जाचा एकही हप्ता तुमच्याकडून थकायला नको. तरच तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे.
अॅक्सिस बँकेने आणलेल्या शुभारंभ नव्या योजने अंतर्गत ही ऑफर दिली आहे. मात्र, जर तुम्हाला वाटत असेल की, बॅंकेकडून सलग १२ महिन्यांचे हप्ते माफ होतील, तर तसं नाहीये. जर कर्जदाराने नियमित कर्ज भरलं, तर त्याला चौथ्या, आठव्या आणि बाराव्या वर्षी असे चार-चार महिने सूट दिली जाईल.
हे कर्ज घर खरेदी, दुरुस्ती, बांधकाम किंवा जमीन घेऊन बांधकामासाठीच वापरता येऊ शकतं. या गृहकर्जाचा व्याजदर ८.३५ टक्के असेल. महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं दुसऱ्या बँकेत गृहकर्ज असेल, तर ते अॅक्सिस बँकेत ट्रान्सफर करण्याची ऑफरही देण्यात आली आहे.