१३ नंबर वाजपेयींसाठी होता लकी

इतरांसाठी अशुभ असणारा १३ आकडा वाजपेयी शुभ मानायचे.

Updated: Aug 17, 2018, 09:01 AM IST
१३ नंबर वाजपेयींसाठी होता लकी title=

नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. वाजपेयींच्या निधनानंतर अनेकजणांकडून त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला जात आहे. 

अटल बिहारी वाजपेयी यांना २०१४ मध्ये भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले होते. त्यांनी तीनवेळा देशाचे पंतप्रधानपद भुषविले. १९९६ साली ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले. मात्र, त्यावेळी त्यांचे सरकार केवळ १३ दिवसच टिकले. १९९८ मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर भाजपचे सरकार १३ महिने सत्तेत राहिले. १९९९ मध्ये तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मात्र वाजपेयी सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. 

काही राजकीय निरीक्षकांच्या मते इतरांसाठी अशुभ असणारा १३ आकडा वाजपेयी शुभ मानायचे. यामागे अनेक कारणे आहेत. १३ मे १९९६ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र, १३ दिवसांमध्येच त्यांचे सरकार पडले. त्यानंतर १९९८ मध्ये आलेले वाजपेयी सरकारही १३ महिनेच टिकले. 

या सगळ्यानंतरही भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता मिळाली. त्यावेळीही १३ आकडा खास ठरला. अटलजींनी १३ पक्षांची मोट बांधून सरकार स्थापन केले. पंतप्रधानपदाची शपथही त्यांनी १३ ऑक्टोबर १९९९ रोजी घेतली. विशेष म्हणजे १३ हा आकडा अशुभ असल्यामुळे यादिवशी शपथ घेऊ नये, असे अटलजींना अनेकजण सांगत होते. मात्र, वाजपेयींनी कोणाचेही न ऐकता १३ ऑक्टोबरलाच शपथ घेतली. सुदैवाने या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. 

२००४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले. त्यावेळी मतदानाची तारीख १३ हीच होती. या निवडणुकीसाठी १३ एप्रिल रोजीच वाजपेयींनी उमेदवारी अर्ज भरला होता. याशिवाय, अटलबिहारी वाजपेयी दौऱ्यावर असताना शक्यतो १३ व्या माळ्यावर किंवा १३ नंबरच्या खोलीत राहायचे. एकूणच अटलजींच्या जीवनावर १३ या अंकाचा प्रभाव राहिला.