भारताचे माजी पंतप्रधान व भाजपाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान असलेले ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. भारतीय राजकारणातील खंबीर व लोकप्रिय नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जादूई नेतृत्त्वामुळे देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ते विशेष लोकप्रिय होते. राजकारणाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. जाणून घेऊयात त्यांच्याविषयीच्या १० दुर्मिळ गोष्टी.
आग्रा कनेक्शन- आग्रा येथील बटेश्वर हे गाव वाजपेयी कुटुंबीयांचे मूळ गाव होते. अटलबिहारी वाजपेयी यांचे आजोबा पंडित श्याम लाल वाजपेयी यांनी बटेश्वरमधून मध्य प्रदेशातील मोरेना येथे स्थलांतर केले होते.
शाळेतील हुशार विद्यार्थी- शालेय जीवनात अटलबिहारी वाजपेयी अत्यंत हुशार विद्यार्थी होते. त्यांनी राज्यशास्त्र विषयात प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर पदवी मिळवली होती. हिंदी, संस्कृत व इंग्रजी विषयातही त्यांनी विशेत प्रावीण्य मिळवले होते.
सार्वजनिक जीवनातील पहिला सक्रीय सहभाग- ग्वाल्हेरच्या आर्य कुमार सभा या संघटनेच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले.
कम्युनिस्ट विचारसरणीकडे होता ओढा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघात येण्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी काहीसे कम्युनिस्ट विचारसरणीकडे झुकलेले होते. मात्र, बाबासाहेब आपटे यांच्या सांगण्यावरून त्यांनी १९३९ साली संघात प्रवेश केला. त्यानंतर १९४७ साली ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले.
वाजपेयींना पहिली अटक कधी झाली- १९४२ साली ब्रिटीश सरकारविरुद्धच्या छोडो भारत चळवळीच्यावेळी अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू प्रेम यांना अटक करण्यात आली होती. त्यांना २३ दिवस तुरुंगात राहावे लागले होते.
वाजपेयी आणि त्यांचे वडील शिकायचे एकाच वर्गात- अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांच्या वडिलांनी कानपूरच्या डीएव्ही महाविद्यालयात एकत्रच कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. एवढेच नव्हे तर ते वसतिगृहावरही एकत्रच राहायचे.
पत्रकारितेशी संबंध- अटलबिहारी वाजपेयींनी पत्रकारितेचे प्रचंड आकर्षण होते. पत्रकार होणे हे त्यांचे स्वप्नही होते. पक्षाचे काम करत असतानाच त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. पक्षाकडून त्यांना सुरुवातीच्या काळात उत्तर प्रदेशातील दीनदयाळ उपाध्याय दैनिकाच्या 'राष्ट्रधर्म' या मासिकाची जबाबदारी देण्यात आली. याशिवाय, संघाच्या 'पांचजन्य' तसेच 'वीर अर्जून' व 'स्वदेश' या दैनिकांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.
वाजपेयींविषयी नेहरुंनी वर्तविलेले भाकीत- देशात १९५७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये वाजपेयी उत्तर प्रदेशच्या बलरामपूर मतदारसंघातून विजयी झाले. संसदेतील त्यांच्या पहिल्याच भाषणाने अनेकांना प्रभावित केले. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अटलबिहारी वाजपेयी एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील, असे भाकीत वर्तविले होते.
मला, नेहरुंचे ते पेटिंग परत पाहिजे- अटलबिहारी वाजपेयी १९७७ साली मोरारजी देसाई सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री झाले. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाच्या साऊथ ब्लॉकमधील कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एक पेटिंग हरवले होते. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी, मला कोणत्याही परिस्थितीत ते पेंटिंग परत पाहिजे, असे कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले होते.
संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारा पहिला नेता- अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंदी भाषेला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे ते पहिली व्यक्ती होते.