आसाम-मेघालय सीमा वाद 50 वर्षानंतर मिटला, अमित शाहांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी

आसाम आणि मेघालय यांच्यातील 50 वर्ष जुना सीमा आंतरराज्य वाद सोडवण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी

Updated: Mar 29, 2022, 07:10 PM IST
आसाम-मेघालय सीमा वाद 50 वर्षानंतर मिटला, अमित शाहांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी title=

नवी दिल्ली : आसाम आणि मेघालय यांनी मंगळवारी 12 पैकी सहा ठिकाणी पाच दशके जुना सीमा आंतरराज्य वाद सोडवण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) आणि मेघालयचे मुख्यमंत्री संगमा (Conrad Kongkal Sangma) यांच्या उपस्थितीत या करारावर (Memorandum of Understanding) स्वाक्षरी करण्यात आली. (Assam-Meghalaya border dispute)

"ईशान्येकडील ऐतिहासिक दिवस. आसाम आणि मेघालय राज्यांमधील आंतरराज्यीय सीमा सांमजस्य़ावर स्वाक्षरी," अमित शाह यांनी असे ट्विट केले आहे.

"वादाच्या 12 पैकी सहा मुद्द्यांचे निराकरण झाले आहे, ज्यात सीमेच्या जवळपास 70 टक्के भागाचा समावेश आहे. उर्वरित सहा मुद्द्यांचे निराकरण लवकरात लवकर केले जाईल. 2014 पासून, मोदीजींनी ईशान्य क्षेत्राच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. आज, मी आसामचे मुख्यमंत्री आणि मेघालयचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमचे सीमा विवाद सोडवण्यासाठी करारावर स्वाक्षरी केल्याबद्दल अभिनंदन करतो," असे शाह यांनी गृह मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात माध्यमांना संबोधित करताना म्हटले.

या करारामुळे दोन्ही राज्यांमधील 884.9 किमी सीमेवरील 12 पैकी सहा ठिकाणी दीर्घकाळ प्रलंबित असलेला वाद सोडवला जाईल. ताराबारी, गिझांग, बोकलापारा, पिल्लंगकाटा, रताचेरा आणि हाहिम या सहा विवादित ठिकाणांमध्ये 36 गावे आहेत ज्यांचे क्षेत्रफळ 36.79 चौरस किमी आहे. 1972 मध्ये मेघालय हे आसाममधून वेगळे होऊन स्वतंत्र राज्य बनले होते.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, आसाम-मेघालय सीमेवरील उर्वरित सहा भागातील वाद येत्या सहा ते सात महिन्यांत सोडवले जाण्याची अपेक्षा आहे आणि ते ईशान्य प्रदेशाला "ग्रोथ इंजिन" बनविण्याच्या दिशेने काम करतील.

"आमच्यासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. या सामंजस्य करारानंतर, पुढील सहा ते सात महिन्यांत, आम्ही उर्वरित विवादित जागेचा प्रश्न सोडवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही ईशान्य भागाला देशातील विकासाचे इंजिन बनवण्याच्या दिशेने काम करू," सरमा यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या “सतत प्रयत्नांमुळे” “ऐतिहासिक टप्पा” गाठता आला, असे ही मुख्यमंत्री म्हणाले.

मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी या कराराचे स्वागत केले आणि म्हटले की यामुळे सीमावर्ती भागात शांतता नांदेल. आसाम आणि मेघालय यांच्यातील सीमा विवाद लवकरात लवकर सोडवावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.