नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हार पत्करावी लागणार असल्याचे विधान केले आहे. केजरीवाल यांनी आपल्या आम आदमी पक्षाच्या अंतर्गत केल्या गेलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे, ५६ टक्के लोकांना पुलवामा हल्ला आणि भारत-पाकिस्तान तणाव याबाबत भारतीय जनता पक्षाने केलेल्या आपल्या आचरणामुळे भाजपा लोकसभा निवडणुकीत निवडून येणार नसल्याचे सांगितले आहे.
केजरीवाल यांच्या या विधानावर भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. केजरीवाल देशातील सैनिकांच्या कारवाईला फायदा-नुकसान म्हणून पाहात आहेत ही अतिशय शरमेची बाब असल्याचे भाजपाने म्हटले आहे.
'आप'ने एक सर्वेक्षण केले असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. या सर्वेक्षणातून ज्याप्रकारे भाजपा, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विवादांचा सामना करत आहे, त्याचा लोकांवर नकारात्मक परिणाम पडत असल्याचे सांगितले. केजरीवाल यांनी याबाबत ट्विट केले आहे. ५६ टक्के लोकांना असे वाटते की, भाजपाला आपल्या चूकीच्या आचरणामुळे लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार असल्याचे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.
56% people said BJP will suffer losses becoz of its conduct https://t.co/gLO8ffPiQV
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 12, 2019
आम आदमी पक्षाने दिल्लीत आपल्या स्वत:च्या हिंमतीवर सर्व सात जागांवर निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते. 'आप'ने आपल्या सहा जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली आहे.