नवी दिल्ली : शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभं केल्याचं किंवा मार दिल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं किंवा ऐकलं असेल. मात्र, अरुणाचल प्रदेशातील शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अरुणाचल प्रदेशातील एका गर्ल्स स्कूलमधील ८८ विद्यार्थीनींना विवस्त्र होण्याची शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या सर्व विद्यार्थीनींवर कथित स्वरुपात शाळेच्या मुख्याध्यापकांबद्दल अपशब्द लिहिले असल्याचा आरोप आहे. आक्षेपार्ह लिखाण असलेला कागद या विद्यार्थिनींकडे सापडला होता.
पापुम पारे जिल्ह्यातील तनी हप्पा (न्यू सागली) येथील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी सांगितले की, या शाळेतील सहावी आणि सातवी इयत्तेच्या ८८ विद्यार्थीनींना २३ नोव्हेंबर रोजी शिक्षा देण्यात आली होती. मात्र, हा प्रकार २७ नोव्हेंबर रोजी समोर आला.
पीडित विद्यार्थीनींनी या प्रकरणी विद्यार्थी संघटनेकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर विद्यार्थी संघटनेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी दोन सहाय्यक शिक्षक आणि एक ज्युनिअर शिक्षकाने सर्वांसमोर कपडे उतरविण्यास सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी प्रतिक्रीया देत म्हटले की, या प्रकरणी पीडित विद्यार्थीनी आणि त्यांच्या आई-वडिलांसोबतच शिक्षकांचीही चौकशी केली जाईल.
या घटनेमुळे शिक्षकांविरोधात संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा अरुणाचल प्रदेश काँग्रेस कमिटीने आक्षेप नोंदवला आहे.