आणखी एका मंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी; 3 दिवसात 3 मंत्र्यांनी सोडला पक्ष

दोन आमदारांनीही दिला राजीनामा     

Updated: Jan 13, 2022, 04:58 PM IST
आणखी एका मंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी; 3 दिवसात 3 मंत्र्यांनी सोडला पक्ष title=

लखनौ : विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहे. पक्ष सोडणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान यांच्यापाठोपाठ मंत्री धरमसिंह सैनी यांनीही पक्ष सोडला आहे.
 
मंत्री धरमसिंह सैनी हे सहारनपूरच्या नाकुर विधानसभा मतदारसंघातुन निवडून आले होते. त्यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे पाठविला आहे. राजीनामा दिल्यानंतर सैनी यांनी सरकारी निवासस्थान आणि सुरक्षाही सोडली आहे. 

मंत्री सैनी यांच्यासोबत आज (१३ जानेवारी) अन्य दोन आमदारांनीही राजीनामा दिला आहे. बिधुनाचे आमदार विनय शाक्य आणि शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा यांनी राजीनामा दिला आहे.

सैनी यांचा सपामध्ये प्रवेश
राजीनामा दिल्यानंतर धरमसिंह सैनी यांनी सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेत सपामध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर अखिलेश यादव यांनी एक फोटो शेअर करत, 'सामाजिक न्यायाचे आणखी एक योद्धा डॉ. धरम सिंह सैनी जी यांच्या आगमनाने आमच्या 'सकारात्मक आणि प्रगतीशील राजकारणाला' अधिक उत्साह आणि बळ मिळाले आहे, असे म्हटले आहे.