नवी दिल्ली: सध्या देशभरात गाजत असलेल्या राफेल घोटाळ्याच्या मुद्द्यानंतर मोदी सरकारने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यापासून चार हात लांब राहायला सुरुवात केली आहे. येत्या शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या व्हायब्रंट गुजरात परिषदेच्यानिमित्ताने त्याचा प्रत्यय आला. यंदा या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आलेल्या उद्योगपतींच्या यादीतून अनिल अंबानी यांचे नाव वगळण्यात आले आहे. राफेल विमान खरेदी व्यवहारातील कथित घोटाळ्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राफेल व्यवहारात अनिल अंबानी यांची रिलायन्स डिफेन्स ही कंपनी ऑफसेट भागीदार आहे. मोदी सरकारने दबाव आणल्यामुळे रिलायन्सला हे कंत्राट मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यामुळे मोदी सरकारची चांगलीच कोंडी झाली होती. त्यामुळे व्हायब्रंट गुजरात परिषदेत भाजपने अनिल अंबानी यांना चार हात दूर ठेवल्याची चर्चा आहे.
व्हायब्रंट परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राज्यात अधिकाअधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व्हायब्रंट गुजरातचे प्रारूप (मॉडेल) देशपातळीवर चांगलेच लोकप्रिय ठरले होते. दर दोन वर्षांनी गुजरातमध्ये या परिषदेचे आयोजन केले जाते. यंदा गुजरात सरकारने या परिषदेसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, आदित्य बिर्ला ग्रूपचे मंगलम बिर्ला आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह १९ उद्योगपतींना आमंत्रित केले आहे. सरकारने मंगळवारी या उद्योगपतींच्या नावांची यादी जाहीर केली.
दरम्यान, या परिषदेत 'संरक्षण व अंतराळ क्षेत्रातील संधी' या विषयासंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत एअरबस ग्रूप इंडिया आणि लॉकहेड मार्टिन यासारख्या विमाननिर्मिती करणाऱ्या कंपन्या सहभागी होणार आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यावेळी उपस्थितांना संबोधित करतील. मात्र, राफेल विमाने तयार करणारी दसॉल्ट एव्हिएशन या कार्यक्रमात भाग घेणार नाही.