गुजरातमध्ये सापडले हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन शहर आणि अतिशय मौल्यवान खजाना

Gujarat: गुजरातमध्ये हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन शहर आणि अतिशय मौल्यवान अवशेष सापडले आहेत. 

Updated: Feb 21, 2024, 07:09 PM IST
गुजरातमध्ये सापडले हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन शहर आणि अतिशय मौल्यवान खजाना  title=

Hadappa Sanskriti : सोनं शोधात खोदकाम करणाऱ्यांच्या हाती ऐतिहासिक खजाना लागला आहे. गुजरातमध्ये  हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन आणि अतिशय मौल्यवान अवशेष सापडले आहेत. हजारो वर्ष जुन्या हडप्पाकालीन संस्कृतीमधील हे दुर्मिळ अवशेष पाहून  पुरातत्वशास्त्रज्ञही चकित झाले आहेत. यामुळे हडप्पाकालीन संस्कृतीमधील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होईल असा दावा केला जात आहे. सध्या अनेक संशोधक येथे दाखल झाले आहेत. 

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात इतिहासाच्या अनेक खाणाखुणा सापडल्या आहेत. कच्छमधील धोलावीरा जागतिक वारसा स्थळापासून 50 किमी अंतरावर असलेल्या लोद्राणी गावात हे अवशेष सापडले आहेत. या परिसरात  हडप्पाकालीन संस्कृतीशी निगडीत अनेक अवशेष सापडले आहेत. यामुळे आता नव्याने सापडलेले हे अवशेष संशोधनात भर घालणारे आहे. 

कच्छ जवळ असलेल्या एका लहानशा खेडे गावातील काही तरुण सोन्याचा शोध घेण्यासाठी खोदकाम करत होते. यावेळी धोलावीरा जवळ त्यांना सोने सापडले  नाही. मात्र,  हडप्पा संस्कृतीची तटबंदी असलेली वस्ती त्यांना सापडली. यानंतर सोन्याचा शोध घेणाऱ्या धोलाविरा हडप्पा साइटचे जुने मार्गदर्शक जमाल मकवाना यांना याबाबत माहिती दिली. मकवाना यांनी तात्काळ साईटवर जाऊन पाहणी केली. येथे सापडलेले अवशेष हे हडप्पाकालीन असल्याचा अधिकृत दुजोरा दिला आहे. 

जमाल मकवाना यांनी तत्काळ याची माहिती एएसआयचे माजी एडीजी आणि पुरातत्वशास्त्रज्ञ अजय यादव यांना दिली. यादव हे सध्या ऑक्सफर्ड स्कूल ऑफ आर्किओलॉजीमध्ये संशोधन अभ्यासक आहेत. यानंतर अजय यादव आणि प्रोफेसर डॅमियन रॉबिन्सन दोघेही गुजरातमधील कच्छ येथे दाखल झाले. त्यांनी या पुरातत्व स्थळाचा आढावा घेतला. येथे सापडलेले अवशेष आणि त्यांची रचना  धोलाविरा हडप्पा साइटची मिळती जुळती असल्याचे या दोघांनी सांगितले. 

मोरोधर नावाचे प्राचीन स्थळ

हे अवशेष तटबंदी प्रमाणे आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञानी याबाबत अधिक संशोधन केले. यावरुन हे हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन शहर असल्याचा दावा केला जात आहे. 4,500 वर्षांपूर्वी हे शहर अस्तित्वात होते. मोरोधारो असे याचे नाव आहे. येथे  उत्खननादरम्यान हडप्पा काळातील अनेक भांडी सापडली आहेत. ही भांडी धोलाविरा येथे सापडलेल्या अवशेषांसारखी असल्याचे पुरातत्वशास्त्रज्ञ अजय यादव यांनी सांगितले. नव्याने अवशेष सापडलेले हे स्थळ हडप्पा कालखंडातील (2,600-1,900 BC) म्हणजेच 1,900-1,300 BC नंतरचे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  धोलावीरा आणि मोरोधर ही दोन्ही ठिकाणं वाळवंटाच्या अगदी जवळ आहेत. ही दोन्ही प्राचीन शहर समुद्रात बुडाली असावीत अशी शक्यता वर्तवली जात आहे.