'तुझी जीप दे आणि नवीकोरी बोलेरो घे' आनंद महेंद्रा यांनी तरुणाला का दिली अशी ऑफर?

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दररोज काही ना काही व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करत असतात.

Updated: Dec 23, 2021, 03:55 PM IST
'तुझी जीप दे आणि नवीकोरी बोलेरो घे' आनंद महेंद्रा यांनी तरुणाला का दिली अशी ऑफर? title=

मुंबई : कार किंवा चारचाकी वाहन घेणे हे सगळ्याच लोकांचे स्वप्न असते. परंतु ते परिस्थितीमुळे सगळ्यांनाच घ्यायला शक्य होत नाही. त्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहाता लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. परंतु देशात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे सगळ्यांनाच अशी वाहनं घेणं शक्य होणार नाही. तसेच काही लोकं असे ही आहेत, ज्यांना साध्या कार घेणे देखील शक्य होत नाहीत. परंतु महाराष्ट्रातील एका व्यक्तीने आपल्या जिद्दीमुळे हे शक्य करुन दाखवलं आहे. त्याने नवीन किंवा सेकंड हँड चारचाकी गाडी विकत घेतली नाही, तर स्वतः भंगारातून त्याने एक चारचाकी गाडी तयार केली आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दररोज काही ना काही व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. ते प्रेरणादायी किंवा मजेदार असतात. आपल्या पेजवर फॉलोअर्सचे व्हिडीओ शेअर करायला ते विसरत नाही.

आपल्या चाहत्यांचे आनंद महेंद्रा नेहमीच मनोरंजन करत असतात. आताही त्यांनी अशी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती किक मारून जीप सुरू करताना दिसत आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

आपण सगळ्यांनीच बाईकला किक स्टार्ट करताना पाहिलं असेल, पण जीप किक स्टार्ट करतानाचा हा अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा देणार बोलेरो

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर या गाडीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत खुद्द आनंद महिंद्रा यांनी त्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. तसेच, या व्यक्तीला नवीन बोलेरो देणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहीले की, ' हे कुठल्याही नियमाशी जुळत नाही, पण, मी आमच्या लोकांच्या कल्पकतेचे आणि क्षमतेचे कौतुक करणं कधीही थांबवणार नाही' असं महिंद्रा यांनी व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय. 

पुढे त्यांनी लिहिलं की, 'या वाहनाच्या बदल्यात मी त्याला वैयक्तिकरित्या बोलेरो गाडी देईन. त्याची ही गाडी इतरांना प्रेरणा देण्यासाठी MahindraResearchValley मध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाऊ शकते.'

ट्विटरवर पोस्ट

आनंद महिंद्रा किती बिझनेस माइंडेड आहेत हे या कॅप्शनकडे बघून समजू शकते. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला. आतापर्यंत 1.69 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओला 10 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर 1000 हून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेक मुद्द्यांवर ते आपले मतही मांडतात.

कशी बनवली कार?

सांगली जिल्ह्यातील अल्पशिक्षित दत्तात्रय लोहार यांनी बाईकचं इंजिन, कारचं बोनेट आणि रिक्षाची चाकं वापरुन अवघ्या 60 हजारातच जिप्सी तयार केलीय. आनंद महिंद्रा यांनी या 'जुगाड जिप्सीचा' व्हिडिओ शेअर करत त्या व्यक्तीला नवीन बोलेरो देणार असल्याचं म्हटलंय.