प्रचारसभेतील भाषणात अमित शहांची घोडचूक; नेटकऱ्यांकडून ट्रोल

गांधी घराण्याने ५५ वर्षात झारखंडसाठी काय केले? 

Updated: Dec 15, 2019, 08:46 AM IST
प्रचारसभेतील भाषणात अमित शहांची घोडचूक; नेटकऱ्यांकडून ट्रोल title=

नवी दिल्ली: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर अमित शहा यांना ट्रोल केले जात आहे. या प्रचारसभेत अमित शहा नेहमीप्रमाणे काँग्रेसवर टीका करण्याच्या नादात एक चूक करून बसले. यावेळी शहा यांनी म्हटले की, आज मी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल बाबा यांना विचारून इच्छितो की, तुम्ही ५५ वर्षांमध्ये झारखंडसाठी काय केले, याचा हिशेब सादर करा. सुरुवातीला त्यांच्या या वक्तव्यातील चूक कोणाच्या ध्यानात आली नाही. मात्र, भाजपच्या ट्विटर हँडलवरून अमित शहा यांच्या भाषणातील मुद्दे ट्विट केले जात होते. त्यावेळी नेटकऱ्यांनी अमित शहा यांची चूक लक्षात आणून दिली. 

झारखंड हे १५ नोव्हेंबर २००० रोजी अस्तित्वात आले. मग अमित शहा सोनिया आणि राहुल गांधींकडून ५५ वर्षांचा हिेशेब कसा मागू शकतात, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला. तसेच झारखंडच्या निर्मितीनंतर १९ पैकी १४ वर्षे राज्यात भाजपचीच सत्ता होती. मग झारखंडच्या विकासासाठी तुम्ही काय केले, असा जाब नेटकऱ्यांनी अमित शहा यांनी विचारला. 

दरम्यान, अमित शहा यांनी आपल्या या भाषणात काँग्रेसवर काश्मीर आणि नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरूनही टीका केली. आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयक आणल्यावर काँग्रेसच्या पोटात का दुखत आहे? बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये शरणार्थी नरकयातना भोगत असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. त्यामुळे हा कायदा मुस्लिमविरोधी नाही. मात्र, काँग्रेसला आमच्या प्रत्येक गोष्टीला मुस्लिमविरोधी ठरवण्याची सवय जडली आहे, अशी टीका यावेळी शहा यांनी केली.