नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर टीका करण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले भाजपचे नेते गोवर्धन झडापिया यांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर प्रदेशमध्ये मोठे पद दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवर्धन झडापिया यांच्याकडे उत्तर प्रदेश या मोठ्या राज्याची जबाबदारी प्रभारी म्हणून सोपविण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. गेल्यावेळी याच राज्यातून भाजपला ७१ जागांवर यश मिळाले होते. यंदा परिस्थिती बदलली असल्यामुळे या राज्यात भाजपला किती जागा मिळतात, यावर सत्तेची पुढील समीकरणे अवलंबून आहेत. या सगळ्या स्थितीत गोवर्धन झडापिया यांना महत्त्वाची जबाबादारी देण्यात आली आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोवर्धन झडापिया यांनी भाजपची साथ सोडली होती. त्यांनी भाजपच्याच उमेदवाराविरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. पण २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी त्यांची भाजपमध्ये घरवापसी केली होती. भाजपकडून नुकतीच १७ राज्यांच्या पक्ष प्रभारींची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये गोवर्धन झडापिया यांच्याकडे उत्तर प्रदेशचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. अमित शहा यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये अमित शहा यांनी जी भूमिका निभावली होती. ती यावेळी काही प्रमाणात गोवर्धन झडापिया यांना निभवावी लागणार आहे.
गुजरातमध्ये २००२ साली भडकलेल्या जातीय दंगलींवेळी गोवर्धन झडापिया तिथे गृह खात्याचे राज्यमंत्री होते. या दंगली आटोक्यात आणण्यासाठी कार्यक्षमपणे भूमिका निभावली नाही. त्यामुळे गोवर्धन झडापिया यांच्यावर त्यावेळी टीका करण्यात आली होती. त्यावेळी मोदींनी झडापिया यांना आपल्या मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. त्यानंतर गोवर्धन झडापिया यांनी कायम मोदींवर टीका केली. आता त्यांच्याकडेच उत्तर प्रदेश सारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्याची जबाबादारी अमित शहा यांनी सोपविली आहे.
२००७ मध्ये गोवर्धन झडापिया यांनी स्वतःचा पक्ष काढला होता. आणि भाजपविरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांच्याशी आघाडी केली आणि नंतर आपला पक्षच त्यांच्या पक्षात विलिन करून टाकला.
नव्या रचनेत राजस्थानचे प्रभारी म्हणून प्रकाश जावडेकर यांना कायम ठेवण्यात आले आहे. थावरचंद गेहलोत यांच्याकडे उत्तराखंडचा कारभार पाहण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये गोवर्धन झडापिया यांच्या मदतीसाठी दुश्यंत गौतम आणि नरोत्तम मिश्रा यांनाही नेमण्यात आले आहे.