नवी दिल्ली - ओला, उबेरप्रमाणे आता एखाद्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात न्यायाचे असेल, तर रुग्णवाहिकाही (अॅम्ब्युलन्स) अॅपच्या माध्यमातून बुक करता येईल. केंद्र सरकार यावर गंभीरपणे विचार करत आहे. यासाठी सरकार सर्व खासगी रुग्णवाहिकांना एका छत्राखाली आणणार असून, त्यांना प्रत्येक फेरीनंतर त्याचे पैसे दिले जाणार आहेत. नव्याने रुग्णवाहिका घेण्यापेक्षा आहे त्याच रुग्णवाहिकांचा परिणामकारक वापर करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आखली आहे. त्याचबरोबर यापुढे रुग्णवाहिका न घेण्याचा निर्णयही सरकारने केला आहे.
रुग्णवाहिकाही ओला-उबेरप्रमाणे अॅपआधारित चालविण्याचा प्रयोग सर्वप्रथम देशात आंध्र प्रदेश येथे लागू करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हेच प्रारुप आता देशभरात लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यासाठी केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाने योजनाही तयार केली आहे. आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचे मुख्य व्यवस्थापक मनोज झालानी म्हणाले की, ओला-उबेरप्रमाणेच आता रुग्णवाहिकाही अॅप आधारित करण्यात येणार आहेत. तुमच्याकडील मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही त्याचे बुकिंग करू शकता. त्याचबरोबर फोनच्या माध्यमातूनही बुकिंग करता येईल. यामुळे सर्व रुग्णवाहिकांमध्ये समन्वय ठेवणे सरकारला शक्य होणार आहे.
सध्या एखादी नवी रुग्णवाहिका विकत घ्यायची म्हटली तर १२ ते २० लाख रुपये खर्च येतो. याशिवाय चालक आणि वैद्यकीय पथक सोबत ठेवायचे म्हटले तर त्यासाठी वेगळा प्रतिमहिना ४० हजार रुपये खर्च होतो. यातून बचत करण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांचा पुरेपूर वापर करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.