एनआरआय आणि त्यांच्या जोडीदारांसाठी महत्त्वाची बातमी

यामुळे, एनआरआय विवाहांची आकडेवारी सहज मिळू शकेल

Updated: Jun 7, 2018, 03:49 PM IST
एनआरआय आणि त्यांच्या जोडीदारांसाठी महत्त्वाची बातमी  title=

नवी दिल्ली : केंद्रीय महिला तसंच बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी एनआरआय आणि त्यांच्या जोडीदारांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. भारतात पार पडणाऱ्या सर्व एनआरआय लग्नांना पुढच्या ४८ तासांच्या आत नोंदणीकृत करण्याचे आदेशच मनेका गांधी यांनी दिलेत. उल्लेखनीय म्हणजे, आत्तापर्यंत भारतात पार पडणाऱ्या विवाह सोहळ्यांच्या नोंदणीकरणासाठी कोणतीही वेळेची सीमा निश्चित करण्यात आलेली नव्हती. 

विधी आयोगानंही या नोंदणीकरणाला दुजोरा दिला होता. आयोगानं विवाहाच्या नोंदणीकरणासाठी ३० दिवसांचा अवधी देण्याची शिफारस केली होती... त्यानंतर प्रत्येक दिवसाचे ५ रुपये अशा हिशोबानं दंड लावण्याचीही शिफारस आयोगानं केली होती. 

परंतु, गांधी यांनी जाहीर केल्यानंतर एनआरआय विवाहांना पुढच्या ४८ तासांच्या आत नोंदणी करावी लागणार आहे. अन्यथा अशा व्यक्तींना पासपोर्ट किंवा व्हिजा मिळू शकणार नाही. लवकरच रजिस्ट्रारकडेही हे आदेश सोपवण्यात येतील. यामुळे, एनआरआय विवाहांची आकडेवारी सहज मिळू शकेल तसंच ही आकडेवारी केंद्रीय डाटाबेसमध्ये ठेवण्यात येईल.