तिरुअनंतपुरम : चेन्नईच्या थिरुवल्लूर जिल्ह्यात एका ४३ वर्षीय व्यक्तीला वीजेचा फोटो काढण्याच्या नादात आपला जीव गमवावा लागलाय. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव एम एम रमेश असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. रमेश सुन्नमपुक्कुलममध्ये आपल्या मित्रासोबत शेतात जात असताना ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी जवळपास ३.३० वाजता ही घटना घडली. चालता चालता त्यानं आकाशात चमकणाऱ्या विजेला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या नादात वीज रमेशवरच कोसळली... आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
अचानक घडलेल्या या घटनेनं रमेशच्या कुटुंबावर आघात कोसळलाय. रमेशच्या मागे ३८ वर्षांची पत्नी आणि १३ वर्षांची मुलगी आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर पोलिसांनी जनतेला सावधानतेचा इशारा दिलाय. वीजेचा फोटो न काढण्याचा सल्ला पोलिसांनी दिलाय.