अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना झोपड्या दिसून नयेत म्हणून... उभी राहतेय भिंत !

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मिलानिया ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहेत. 

Updated: Feb 13, 2020, 08:57 PM IST
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना झोपड्या दिसून नयेत म्हणून... उभी राहतेय भिंत ! title=

अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मिलानिया ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहेत. हे दाम्पत्य गुजरात दौऱ्यावर असणार आहे. ट्रम्प हे अहमदाबाद येथील विमानतळावर उतरणार आहेत. मात्र, विमानतळ परिसरात रस्त्याच्या बाजुला झोपड्या आहेत. या झोपड्या ट्रम्पना दिसू नयेत या ठिकाणी मोठी भिंत उभी केली जात आहे. याबाबतचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. दरम्यान, आपल्याला याची काही कल्पना नाही, अशी माहिती अहमदाहबादच्या महापौर बिजल पटेल यांनी दिली.

Image

डोनाल्ड ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या अतिमहत्त्वाच्या पाहुण्याच्या स्वागतासाठी गुजरातमध्ये जय्यत तयारी सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या मार्गाने ट्रम्प जाणार आहेत, त्या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. या संपूर्ण रस्त्याला डेकोरेटीव्ह लाइट्स लावण्यात येणार आहेत.

Image

गुजरातचे अहमदाबाद शहर सजवण्यात विशेष लक्ष देण्यात येत आहे. हे शहर सुंदर दिसावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. दरम्यान, नेमक्या ट्रम्प जाणार त्याच मार्गावर झोपड्या दिसत आहेत. म्हणूनच अहमदाबादमध्ये झोपड्यांना झाकण्यासाठी एक मोठी भिंतही उभी केली जात आहे. 

डोनाल्ड ट्म्प आणि इतर विदेशी पाहुण्यांना रस्त्यांच्या कडेला झोपड्या दिसू नयेत, यासाठी अहमदाबादची महापालिका झोपड्यांसमोर भिंत उभारत आहेत. या भिंती विटांच्याच कायमस्वरुपी बांधण्यात येत असल्याचे दिसत आहे.  अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानळाला इंदिरा गांधी पूलाने जोडणारा मार्गाच्या बाजूला मोठी झोपडपट्टी आहे. ही झोपडपट्टी दिसून नये, म्हणून भिंत उभारण्यात येत आहे. त्याठिकाणी काम सुरुही झाले आहे.

दरम्यान, झोपडपट्टी ठिकाणी भिंत उभारण्यात येत असल्याची माहिती अहमदाहबादच्या महापौर बिजल पटेल यांना विचारली असता, त्यांनी कल्पना नसल्याचे सांगितले. आपल्याला या भिंतीबाबत काहीही माहिती नाही. मी भिंत पाहिलेली नसून, याबाबत मला काहीच माहीत नाही, असे पटेल म्हणाल्या.

दरम्यान, अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर देखील अमेरिकेत झालेल्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमासारखाच मेगा इव्हेंट करण्याची जय्यत तयारी केली जात आहे. या स्टेडियम पार्किंगमध्ये ३००० कार, तर १०,००० दुचाक्या पार्क करता येवू, शकतात इतकी क्षमता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे देशाचे आणि जगाचे लक्ष आहे.