Tesla नंतर आता Volkswagen ने केली EV कारवरील इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याची मागणी

 भारतात EV कारांची वाढती मागणी पाहता परदेशी कार कंपन्यांना येथे बाजारपेठेची मोठी संधी दिसत आहे

Updated: Aug 12, 2021, 08:32 AM IST
Tesla नंतर आता Volkswagen ने केली EV कारवरील इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याची मागणी title=

मुंबई : भारतात EV कारांची वाढती मागणी पाहता परदेशी कार कंपन्यांना येथे बाजारपेठेची मोठी संधी दिसत आहे. नुकतेच जगातील दिग्गज इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने भारत सरकारला आयात होणाऱ्या कारवरील कर कमी करण्याची मागणी केली होती. आता या मागणीबाबत जर्मन कार मेकर कंपनी फॉक्सवॅगनसुद्धा पुढे सरसावली आहे. फॉक्सवॅगननेही भारत सरकारला EV कारांवर लागणारा आयात कर कमी करण्याची मागणी केली आहे. अशामुळे देशातील ऑटो इंडस्ट्रीमध्ये दोन मतप्रवाह दिसून येत आहेत.

देशातील बाजारावर परिणाम नाही
Volkswagen कंपनीचे म्हणणे आहे की, भारत सरकार EV वर असलेले सध्याचे 100 टक्के शुल्क कमी करून 25 टक्क्यांवर आणत असेल तर यामुळे देशातील ऑटो इंडस्ट्रीवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. यामुळे देशात गुंतवणूकीला चालना मिळू शकते.

विरोधातही मते
सरकार विदेशी EV कारांपासून 100 टक्के टॅक्स वसूल करीत आहे. टेस्लाच्या निवेदना नंतर सरकार या रेटला 40 टक्क्यांवर आणण्याचा विचार करीत आहे. आयात कर कमी करण्याची मागणी मर्सिडीज बेंज आणि ह्यृंदाई मोटार्ससुद्धा आहे. टाटा उद्योग समुहाकडून या निवेदनाचा विरोध करण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, आयात कर कमी केल्याने देशातील ऑटो इंडस्ट्रीवर परिणाम होईल.

भारत सरकारने स्थानिक पातळीवर मॅन्युफॅक्चरिंगला चालना देण्यासाठी अनेक उद्योगांची इम्पोर्ट ड्युटी वाढवली आहे.