कर्नाटकनंतर गोव्यातही राजकीय भूकंप, काँग्रेसला जोरदार धक्का

आजच रात्री या घडामोडी होणार असल्याचीही खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळतेय

Updated: Jul 10, 2019, 08:44 PM IST
कर्नाटकनंतर गोव्यातही राजकीय भूकंप, काँग्रेसला जोरदार धक्का  title=

प्रताप नाईक, झी २४ तास, पणजी : कर्नाटकनंतर गोव्याही मोठी राजकीय उलथापालथ होण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. गोव्यात काँग्रेसचे १० आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. यामध्ये विरोधी पक्ष नेते बाबू कावळेकर यांचादेखील सहभाग असल्याची चर्चा आहे. याचं 'फळ' म्हणून काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते बाबू कावलेकर यांना उपमुख्यमंत्री पद देण्याबाबतही चर्चा आहे. सद्य सरकारमध्ये असणाऱ्या गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष यांना बाजूला करण्याची रणनीती भाजपानं आखलीय. आजच रात्री या घडामोडी होणार असल्याचीही खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळतेय. राज्यपाल मृदला सिन्हा रात्री उशिरा दिल्लीहून गोव्यात दाखल होणार आहेत.

असं आहे सध्याचं गोवा विधानसभेतील पक्षीय बलाबल...

भाजपा - १७

काँग्रेस - १६

महाराष्ट्र गोमंतक पक्ष - १

गोवा फॉरवर्ड - ३

अपक्ष - ३

गोवा विधानसभेच्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधानसभा अधिवेशनापूर्वी काँग्रेसच्या १५ पैंकी १० आमदार फुटले आहेत. रात्री ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यानंतर त्यापैंकी काहींचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.

गोव्याच्या राज्यपाल सध्या दिल्लीत असून त्या तातडीने गोव्यात येण्यास निघाल्या आहेत. त्या मध्यरात्री गोव्यात पोचतील त्यानंतर किंवा सकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो.

हे आहेत राजीनामा देणारे १० आमदार

१. काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते बाबू कावलेकर

२. आमदार बाबुश मन्सुरात

३. आमदार जेनीफेर मन्सूरात

४. आमदार टोनी फर्नांडिस

५. आमदार फ्रान्सिस सिल्व्हेरिया

६. आमदार फिलिफ

७. आमदार क्लाफासियो

८. आमदार वाईलफ्रेड डे सा

९. आमदार नीलकांत हलनकर

१०. आमदार फर्नाडिस

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही फूट पडल्याचं म्हटलं जातंय. या १० आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँगेसकडे प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो, दिगंबर कामत आणि आलेक्स रेजिनाल्ड हेच आमदार राहणार आहेत. त्यापैंकी रेजिनाल्ड वगळल्यास इतर सर्व माजी मुख्यमंत्री आहेत.

सभापती राजेश पाटणेकर हे डिचोलीहून पर्वरी विधानसभा संकुलात येण्यास निघाले आहेत. ते पोचल्यावर हा गट भाजपमध्ये विलीन केला जाणार आहे. या आधी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांनाही भाजपने याच पद्धतीने प्रवेश दिला होता.