नवी दिल्ली : Union Budget 2022 : पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली.
मध्यमवर्गीय आणि गरिबांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी खासगी बिल्डरांशी चर्चा करणार आहोत. मध्यस्थांमुळे वाढणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 80 लाख घरे बांधण्यात येणार आहेत, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, देशातील मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी काम करण्यात येणार आहे. 112 जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या जिल्ह्यातील तालुक्यांच्या विकासासाठी, गावांना रस्त्याने जोडण्यासाठी व्हिलेज इन्फ्रास्ट्रक्चर योजना आणण्यात आली आहे. यासाठी सध्याच्या योजनांचे एकत्रीकरण केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
तसेच कोटी घरांमध्ये नळाचे पाणी पोहोचविण्यासाठी 60 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार 3.8 कोटी घरांमध्ये नळाचे पाणी पोहोचविण्यासाठी या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी यावेळ दिली.