मुख्यमंत्रिपदाची खुर्ची का सोडली? अरविंद केजरीवाल यांनी अखेर केला खुलासा, 'मला पैसे...'

मी गेल्या 10 वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत होतो. त्यामुळे नरेंद्र मोदींना वाटलं की, जर यांच्यापासून जिंकायचं असेल तर प्रामाणिकपणावरच हल्ला करावा. यासाठी माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करण्यात आले. आमच्या मंत्र्याना, नेत्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं असा आरोप अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 22, 2024, 01:41 PM IST
मुख्यमंत्रिपदाची खुर्ची का सोडली? अरविंद केजरीवाल यांनी अखेर केला खुलासा, 'मला पैसे...' title=

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर आतिशी मार्लेना (Atishi Marlena) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आप नेत्या आतिशी मार्लेना दिल्लीच्या सर्वात तरुण आणि तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्याआधी सुषमा स्वराज आणि शीला दिक्षित यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी 17 सप्टेंबरला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. दरम्यान आपण मुख्यमंत्रीपद का सोडलं याचा खुलासा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर आम आदमी पक्षाने 'जनता की अदालत' कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी अरविंद केजरीवाल यांना सभेला संबोधित केलं. 

"4 एप्रिल 2011 रोजी अण्णांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू झाले. आम्ही प्रामाणिकपणे सरकार चालवत होतो आणि जनतेला मोफत वीज, मोफत पाणी, महिलांसाठी मोफत बस अशा सुविधा दिल्या. ज्येष्ठांना मोफत तीर्थयात्रा करुन दिली. रुग्णालये, मोहल्ला दवाखाने आणि उत्कृष्ट शाळा बांधल्या. 10 वर्षे प्रामाणिकपणे काम केल्यानंतर नरेंद्र मोदींना वाटू लागले की यांच्यावर मात करायची असेल तर प्रामाणिकपणावर प्रहार केला पाहिजे. त्यामुळेच त्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले. आमच्या मंत्री आणि नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले," असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याचा उल्लेख करत सांगितलं की, 'मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीची भूक नसल्याने राजीनामा दिला आहे. मला पैसे कमवायचे नाहीत. देशाचे राजकारण बदलण्यासाठी आम्ही आलो होतो. मी नेता नाही. माझी गेंड्याची कातडी नाही. भाजपाचे लोक जेव्हा मला चोर आणि भ्रष्ट म्हणतात तेव्हा मला वाईट वाटते. मी आज येथे आलो आहे कारण मला फार दुःख झालं आहे. मीही काही दिवसांत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडणार आहे. आज माझ्याकडे घरही नाही, पण मला लोकांचे खूप प्रेम मिळाले आहे. दिल्लीतील अनेक लोकांकडून मेसेज आले की तुम्ही माझ्या घरी या आणि राहा".

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आपल्या भाषणात म्हणाले, "लोकांना दुःख आहे की केजरीवाल आता मुख्यमंत्री नाहीत. पण केजरीवाल यांनी हुकूमशहाच्या तुरुंगाच्या सळ्या तोडल्याचाही लोकांना आनंद आहे. तुरुंगात मला सांगण्यात आले की तुमची पत्नी आजारी आहे आणि तुमचा मुलगा बाहेर शिकत आहे. त्यांनी माझ्या खात्यातून 10 लाख रुपयेही जप्त केले. माझा मुलगा कॉलेजमध्ये शिकतो. त्याची फी भरण्यासाठी मला लोकांपर्यंत पोहोचावे लागले. माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. बाहेरुन जमत नाही हे लक्षात आल्यानंतर आतून तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांचा निर्लज्जपणा बघा, मनीष सिसोदिया यांनी केजरीवाल यांचे नाव दिल्याचे सीबीआयने म्हटले आहे. मला तुरुंगात सांगण्यात आले की बघा, केजरीवाल यांनी तुमचं नाव घेतलं आहे, तुम्ही त्यांचं नाव घ्या म्हणजे वाचाल. मी त्यांना म्हणायचो, तुम्ही लक्ष्मणाला रामापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहाता. लक्ष्मणाला रामापासून वेगळे करण्याची ताकद जगात कोणामधेच नाही. अरविंद केजरीवाल यांच्याशी माझी 26 वर्षे जुनी मैत्री आहे. ते माझे राजकीय गुरु आहेत"