उत्तर प्रदेशात एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलाने गावठी पिस्तुलातून गोळी घालून आपल्या मुलीची हत्या केल्याचा महिलेचा आरोप आहे. मुलगा सध्या सहावीत शिकत असून, त्याचे आई-वडील शेतकरी आहेत. पीडित 16 वर्षीय मुलगी नववीत शिकत होती. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.
“आईने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे त्या मुलावर आयपीसी कलम 304-A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे,” असं संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, मुलाने शस्त्र कसे मिळवले याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कारण त्याच्या पालकांनी त्यांच्याकडे घरी पिस्तूल नाही असं सांगितलं आहे.
पोलीस सध्या घराजवळ लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्हीमधील फुटेज तपासत आहेत. तसंच मुलाच्या वडिलांविरोधात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. आम्ही त्या केसेसची माहिती मिळवत आहोत असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आपल्या 13 आणि 16 वर्षांच्या दोन बहिणींसह खेळत होता. यावेळी त्यांचे पालक घऱी होते. मुलाने गावठी पिस्तूल आणलं होतं आणि त्याच्यासह खेळत होता. पण अचानक पिस्तुलातून गोळी सुटली आणि 16 वर्षाच्या बहिणीच्या पोटात जाऊन लागली. यानंतर ती तिथेच खाली कोसळली.
गोळीचा आवाज ऐकल्यानंतर शेजारी धावत घरी आले. यावेळी त्यांना मुलगी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेली दिसली. त्यांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी पोहोचताच तिला मृत घोषित केलं.