हरियाणाच्या पानीपतमध्ये पोलिसांनी महिलेने प्रियकरासह मिळून पतीची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी तीन वर्षानंतर महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आरोपींनी सर्वात आधी पीडित विनोद यांचा अपघात करत हत्या करण्याची योजना आखली होती. पण यातून ते वाचल्यानंतर गोळ्या घालून ठार करण्यात आलं.
विनोद यांना 5 ऑक्टोबर 2021 रोजी पंजाब नोंदणीकृत वाहनाने धडक दिली होती. पण या अपघातातून ते वाचले होते. मात्र त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. दोन महिन्यांनंतर, 15 डिसेंबर 2021 रोजी विनोद यांची पानिपत येथे घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना विनोद यांची पत्नी निधी आणि तिचा प्रियकर सुमित यांनी हा हत्येचा कट रचल्याची माहिती मिळाली. आधी त्यांनी अपघात करुन विनोद यांना मारण्याचा प्रयत्न केला. पण तो फसल्यानंतर गोळ्या झाडल्या.
विनोदचे यांचे काका वीरेंद्र यांनी डिसेंबर 2021 मध्ये तक्रार दाखल केली तेव्हा या प्रकरणाची नोंद झाली. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, विनोद यांच्या अपघातानंतर चालक देव सुनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. 15 दिवसांनी देव सुनार याने विनोद यांच्याशी संपर्क साधत पैसे देत प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केा. पण विनोद यांनी नकार दिल्यानंतर देव सुनारने धमकी दिली.
15 डिसेंबर 2021 रोजी देव सुनार पिस्तूल घेऊन विनोद यांच्या घऱात घुसला. त्याने दरवाजा आतून बंद केला आणि विनोद यांच्यावर गोळ्या झाडल्या. विनोद यांना रुग्णालयात नेण्यात आलं असता मृत घोषित करण्यात आलं.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देव सुनार याला पाणीपतच्या जेलमध्ये बंद करण्यात आलं होतं, आणि खटला सुरु होता. काही दिवसांपूर्वी विनोद यांच्या ऑस्ट्रेलियातील भावाने पोलिसांना मेसेज करुन गुन्ह्यात इतर आरोपीही सहभागी असावेत असा संशय व्यक्त केला होता. यानंतर अधिकाऱ्यांना याचं गांभीर्य लक्षात घेत पुन्हा तपास सुरु केला. त्यांनी कोर्टाकडे प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची परवानगी मागितली.
पोलिसांनी तपास सुरु केला असता देव सुनार हा सुमित नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता हे समोर आलं. तसंच सुमित विनोद यांची पत्नी निधीच्या संपर्कात होता हेदेखील उघड झालं. 7 जूनला पोलिसांना सुमितला अटक केली. चौकशी केली असता त्याने विनोदच्या अपघाताचा कट रचल्याचा आणि नंतर हत्या केल्याची कबुली दिली.
सुमितने पोलिसांना सांगितलं की, जीममध्ये ट्रेनर असताना निधीसोबत भेट झाली आणि यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. जेव्हा विनोद यांना त्यांच्या मैत्रीबद्दल समजलं तेव्हा त्याने दोघांनाही सुनावलं. यामुळे विनोद आणि निधी यांच्यात वाद झाला. यानंतर निधी आणि सुमित यांनी अपघात करुन विनोद यांची हत्या करण्याचा कट आखला.
पोलिसांनी सांगितलं की, सुमितने देव सुनारला 10 लाख रुपये देऊ केले आणि हत्येचा सर्व खर्च भागवला. देव सुनारला पंजाब-नोंदणीकृत लोडिंग पिकअप ट्रक देण्यात आला होता, त्याने ऑक्टोबरमध्ये याच ट्रकने विनोद यांनाधडक दिली. विनोद वाचल्यावर त्यांनी त्याला गोळ्या घालण्याची योजना आखली. देव सुनारची जामीनावर सुटका केल्यानंतर त्यांनी त्याला शस्त्र मिळवून दिलं. माफी मागण्याच्या बहाण्याने त्याला विनोदच्या घरी पाठवण्यात आले. 15 डिसेंबर 2021 रोजी देव सुनारने घरात घुसून विनोदवर गोळ्या झाडल्या.
सुमित देव सुनारच्या केसेस आणि कुटुंबाचा खर्च भागवत होता. निधी आणि सुमित या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.