धक्कादायक! शाळेतच 50 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, आरोपीची ओळख उघड झाल्यानंतर पालकांसह पोलीसही हादरले

हरियाणात सरकारी शाळेत मुख्याध्यापकानेच 50 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणाच्या जिंद जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत.   

शिवराज यादव | Updated: Nov 6, 2023, 04:12 PM IST
धक्कादायक! शाळेतच 50 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, आरोपीची ओळख उघड झाल्यानंतर पालकांसह पोलीसही हादरले title=

हरियाणात एका मुख्याध्यापकानेच शाळेतील विद्यार्थिनींचा लैगिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. जिंद जिल्ह्यातील सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने एक, दोन नव्हे तर 50 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 5 सदस्यांचं तपास पथक तयार केलं होतं. या पथकाचे प्रमुख पोलीस उपअधिक्षक अमित कुमार भाटिया यांनी, आरोपीला शनिवारी अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. 

"आरोपी 5 दिवस फरार होता. पण आमच्या पथकाने त्याला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. आम्ही कोर्टात पोलीस कोठडीची मागणी करणार आहोत," असंही त्यांनी सांगितलं आहे. 

हरियाणामधील महिला आयोगाने सांगितलं आहे की, जिंद जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या 50 विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर प्रशासनाने मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली आहे. यानंतर हरियाणा पोलिसांनी सोमवारी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणु भाटिया यांना पंचकुला येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली होती की, "आम्हाला एकूण 60 विद्यार्थिनींकडून लिखीत तक्रार मिळाली आहे. यापैकी 50 मुलींनी मुख्याध्यापकाने आपला शारिरीक छळ केल्याचा आरोप केला आहे. तर उर्वरित 10 मुलींनी मुख्याध्यापक अशा गोष्टींमध्ये सहभागी असल्याची आपल्याला माहिती होतं असं सांगितलं".

जिंद जिल्ह्याच्या पोलिसांनी सोमवारी मुख्याध्यापकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 354-ए (लैंगिक छळ), 341 (चुकीचा प्रतिबंध) आणि 342 आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

रेणु भाटिया यांनी सर्व पीडित मुली अल्पवयीन असल्याची माहिती दिली होती. आरोपी मुलींना त्याच्या कार्यालयात बोलवायचा आणि नंतर अश्लील कृत्य करायचा असंही त्यांनी सांगितलं. सूत्रांच्या माहितीनुसार, काही मुलींना थेट पंतप्रधान कार्यालय आणि महिला आयोगाला पत्र लिहून या प्रकरणाला वाचा फोडली होती.