Delhi Hit and Run Case: दिल्लीच्या नांगलोई परिसरात हिट अँड रनचं प्रकरण धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या अपघातात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार, कॉन्स्टेबल साध्या कपड्यांमध्ये आपल्या दुचाकीवरुन निघाला होता. यावेळी मागून येणारी कार त्याच्या दुचाकीला जोरदार धडक देते आणि त्याला फरफटत पुढे जात होते. रविवारी ही घटना घ़डली. संदीप अशी कॉन्स्टेबलची ओळख पटली आहे. नांगलोई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल संदीप नागलोई परिसरात अचानक दरोडे वाढल्याने पोलीस साधअया कपड्यांमध्ये गस्त घालत होते. यावेळी संदीप आपल्या बाईकवरुन ते फिरत होते. यादरम्यान त्यांना एक व्हॅगनआर कार दिसली, जी अत्यंत बेदरकारपणे चालवली जात होती. संदीप यांनी चालकाला गाडीचा वेग कमी करण्यास सांगितलं. पण त्याने गाडी थांबवली नाही. यानंतर कॉन्स्टेबल संदीप आपली बाईक कारच्या पुढे घेऊन गेले होते.
A Delhi Police constable was crushed to death after a car hit him from behind, dragging him for 10 meters - #WATCH#Viral #ViralVideo #Nangloi #DelhiAccident #PoliceConstable pic.twitter.com/6MXCA4QHGe
— TIMES NOW (@TimesNow) September 29, 2024
यावेळी व्हॅगनआरच्या चालकाने अचानक कारचा वेग वाढवला आणि संदीप यांच्या बाईकला मागून जोरदार धडक दिली. यानंतर कारने त्यांना 10 मीटरपर्यंत फऱफटत नेलं. व्हॅगनआरने यावेळी समोर उभ्या एका कारलाही धडक दिली. संदीप यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांना आधी सोनिया रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तेथून त्यांना पश्चिम विहारच्या बालाजी रुग्णालयात ट्रान्सफर करण्यात आलं. पण गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
डीसीपी जिमी चिराम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, व्हॅगनआरमध्ये दोन लोक बसलेले होते, जे घटनास्थळावरुन फरार झाले होते. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यासाठी टीम गठीत केली आहे. दोघांचीही ओळख पटली आहे. पोलिसांनी ज्या बाईकने संदीप यांना धडक दिली ती जप्त केली आहे. प्राथमिकदृष्ट्या हा रस्ते अपघात दिसत आहे. पण पोलीस यामागे अन्य काही कारण आहे का याचा तपास करत आहे.