मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी (Sidhi Distrcit) जिल्ह्यात एका व्यक्तीने आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होऊ लागला होता. या व्यक्तीवर कडक कारवाई करा अशी मागणी सोशल मीडियावरुन होऊ लागली होती. थेट मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही या व्हिडीओची दखल घेतली होती. यानंतर अखेर पोलिसांनी कारवाई करत आरोपी प्रवीण शुक्ला याला अटक केली आहे.
सिधी जिल्ह्यात सहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र घटनेच्या सहा दिवसांनंतर पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना, व्हिडीओत दिसणारा आरोपी प्रवीण शुक्ला याला ताब्यात घेतलं असून, चौकशी सुरु आहे अशी माहिती दिली आहे.
भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 294 (अश्लील कृत्ये) आणि 504 (शांतता भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान) आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत प्रवीण शुक्ला याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना प्रशासनाला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत प्रवीण शुक्ला याच्याविरोधात कारवाई करण्याचा आदेश दिला होता.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी आरोपी प्रवीण शुक्ला हा भाजपा आमदार केदार शुक्ला यांचा प्रतिनिधी असल्याचा दावा केला आहे. प्रवीण शुक्ला याने फेसबुकवर आमदार केदार शुक्ला यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. पण भाजपाने मात्र प्रवीण शुक्ला याच्याशी पक्षाचा काही संबंध नाही सांगत आरोप फेटाळून लावले आहेत.
केदार शुक्ला यांनीही आरोप फेटाळले असून, प्रवीण शुक्ला आपला प्रतिनिधी नसल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यांनी आपण त्याला ओळखत असल्याचं मान्य केलं आहे.
दुसरीकडे प्रवीण शुक्लाचे वडील रमाकांत शुक्ला यांनी आपला मुलगा केदार शुक्ला यांचा प्रतिनधी असल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले आहेत की, "तो भाजपा आमदाराचा प्रतिनिधी आहे. त्यामुळेच विरोधकांकडून त्याला टार्गेट केलं जात आहे. याप्रकरणी सविस्तर चौकशी होईल आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे".