लहान मूल मोठं होत नाही तोपर्यंत पालकांसाठी ती एक मोठी जबाबदारी असते. उत्सुकतेपोटी ही लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नसतो. आपण एखादी गोष्टी केल्यास जखमी होऊ किंवा जीवाला धोका निर्माण होईल याची त्यांना अजिबात कल्पना नसते. यामुळे त्यांच्यावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी लागते. पण जर नजर चुकली तर काय होऊ शकतं हे दर्शवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शोरुममध्ये दरवाजाजवळ खेळत असताना काचेचा एक दरवाजा अंगावर कोसळल्याने तीन वर्षांच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.
पंजाबच्या लुधियानात ही घटना घडली आहे. येथे तीन वर्षाच्या मुलीच्या अंगावर जड काचेचा दरवाजा कोसळला. दरवाजा कोसळल्यानंतर मुलीचा आक्रोश ऐकून उपस्थित लोक आणि तिच्या नातेवाईकांनी धाव घेतली. त्यांनी दरवाजा बाजूला करुन तिला उचललं आणि रुग्णालयाकडे धाव घेतली. पण रुग्णालयात पोहोचले तेव्हा मुलीला मृत घोषित करण्यात आलं. मुलीच्या निधनाने तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
24 नोव्हेंबरला लुधियानाच्या घुमार मंडी मार्केटमधील शोरुममध्ये रात्री 8.15 वाजता ही घटना घडली. ही संपूर्ण घटना शोरुममधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामध्ये मुलगी शोरुममध्ये दरवाजाजवळ खेळताना दिसत आहे. यावेळी ती शोरुममध्ये प्रवेश करण्यासाठी लावण्यात आलेल्या गोल दरवाजाजवळ दिसत आहे.
PUNJAB | A three-year-old girl died in Punjab's Ludhiana after a giant glass door at a showroom fell on top of her. The incident took place at the Ghumar Mandi Market in the city, and the girl was rushed to a hospital soon after, where she was declared dead. The incident was… pic.twitter.com/WSiUtpmEyx
(@Rajmajiofficial) November 28, 2023
मुलगी खेळत असतानाच काचेच्या गेटचा एक भाग मुलीच्या अंगावर कोसळतो. यावेळी जोरात आवाज येतो. मुलगी दरवाजाच्या खाली दबली जाते. दरवाजा कोसळताना झालेला आवाज आणि मुलीचा आरडाओरडा ऐकून तिचे नातेवाईक आणि शोरुममधील कर्मचारी धाव घेतात. यानंतर सर्वजण दरवाजा उचलतात आणि मुलीला बाहेर काढतात. यावेळी एक व्यक्ती मुलीला उचलतो आणि थेट रुग्णालयात जाण्यासाठी धावत सुटतो.
दरवाजा अंगावर कोसळल्यानंतर मुलगी बेशुद्धावस्थेत खाली पडलेली होती. तिला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येतं. पण रुग्णालयात नेताच डॉक्टर तिला मृत घोषित करतात.
कुटुंबीयांनी याप्रकरणी अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल केलेली नाही. पण मुलीच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबाला धक्का बसला आहे. संपूर्ण कुटुंबावर सध्या शोककळा पसरली आहे.