डॉक्टरने आधी पत्नी, मुलांना बेशुद्ध केलं, नंतर एकामागोमाग एक...; सगळं शहर हादरलं

रेल्वेत वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डोळ्यांच्या तज्ज्ञाने कुटुंबाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अधिकारी नैराश्यात होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 6, 2023, 04:47 PM IST
डॉक्टरने आधी पत्नी, मुलांना बेशुद्ध केलं, नंतर एकामागोमाग एक...; सगळं शहर हादरलं title=

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे रेल्वेत काम करणाऱ्या एका डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्ये केल्याने एकच खळबळ उडाली आहे. डोळ्यांचे तज्ज्ञ असणारे डॉक्टर अरुण कुमार रेल्वेत वैद्यकीय अधिकारी पदावर काम करत होते. रायबरेली येथील मॉडर्न रेल्वे कोच फॅक्टरीत ते तैनात होते. अरुण कुमार नैराश्याचा सामना करत होते अशी माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली आहे. 

अरुण कुमार पत्नी आणि दोन मुलांसह रायबरेलीमधील रेल्वे क्वार्टर्समध्ये वास्तव्यास होते. रविवारी ते शेवटचे दिसले होते. दोन दिवसांपासून त्यांचा कोणताच संपर्क होत नसल्याने त्यांचे सहकारी घरी गेले होते. दरवाजा ठोठावल्यानंतरही कोणीच उत्तर देत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घऱात डॉक्टर अरुण कुमार, पत्नी अर्चना, मुलगी आदिवा (12) आणि मुलगा आरव (4) यांचे मृतदेह पडलेले होते. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

पोलिसांना घटनास्थळी हातोडा, ड्रग इंजेक्शन आणि रक्ताचे डाग आढळले. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉक्टरने आधी आपल्या पत्नी आणि मुलांना औषध देऊन बेशुद्ध केलं. यानंतर त्याने त्यांच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. डॉक्टरने नंतर हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला. पण हिंमत न झाल्याने त्याने गळफास घेत जीवन संपवलं. "सध्या आम्हाला इतकंच समजलं असून, शवविच्छेदनानंतर अधिक स्पष्ट होईल असं पोलीस म्हणाले आहेत," अशी माहिती रायबरेलीच्या पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शनी यांनी दिली आहे.

शेजारी कमल कुमार दास यांनी सांगितलं आहे की, या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. डॉक्टर अरुण हे त्यांचे रुग्ण आणि इतरांशी चांगलं वागायचे. त्यांच्या कुटुंबात काहीतरी समस्या असावी. त्यामुळेच हे झालं आहे असं त्यांनी सांगितलं. 

या घटनेनंतर लखनऊ रेंजचे आयजी तरुण गौबा घटनास्थळी पोहोचले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, "त्यांना काही शेजारी आणि सहकाऱ्यांकडून माहिती मिळाली की डॉ कुमार हा संतापत असे. आम्ही ऐकलं आहे की तो अनेकदा लोकांवर रागावत असे. आम्ही सर्व बाजूंनी विचार करत आहोत".