"तुझ्या मृत्यूनंतरच माझं आयुष्य....", आईला झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर दाबला गळा; नंतर सुटकेसमध्ये भरुन....; तरुणीचा धक्कादायक खुलासा

Crime News: बंगळुरुत (Bangalore) एका मुलीनेच आपल्या आईची हत्या (Murder) केल्याने खळबळ माजली आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानतंर तिने आईचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांसमोर तिने आपणच आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आईच आपल्याला मारुन टाक असं म्हणत होती असा तरुणीचा दावा आहे. पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 14, 2023, 03:46 PM IST
"तुझ्या मृत्यूनंतरच माझं आयुष्य....", आईला झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर दाबला गळा; नंतर सुटकेसमध्ये भरुन....; तरुणीचा धक्कादायक खुलासा title=

Crime News: कर्नाटकच्या बंगळुरुमधील मायको लेआऊट पोलीस ठाण्यात 12 जून रोजी नेहमीप्रमाणे काम सुर होतं. पोलीस ठाण्यातील कर्मचारी आपल्या दैनंदिन कामकाजात व्यग्र होती. याचवेळी पोलीस ठाण्यासमोर एक रिक्षा य़ेऊन थांबते. रिक्षातून एक तरुणी खाली उतरते आणि पोलीस ठाण्याच्या दिशेने चालू लागते. यावेळी तिच्या हातात एक सुटकेसदेखील असतं. जेव्हा ती पोलीस ठाण्यात येते तेव्हा ती एखादी तक्रार दाखल करण्यासाठी आली असावं असं पोलिसांना वाटतं. आपलं नाव सोनाली सेन असून फिजिओथेरपिस्ट असल्याचं ती पोलिसांना सांगते. यानंतर पोलीस जेव्हा तिला इथे येण्याचं कारण विचारतात तेव्हा ती आपण आईची हत्या केली आहे असं सांगते. 

तरुणी इतक्या सहजपणे सांगत आहे हे ऐकून पोलिसांचा विश्वास बसत नाही. त्यांना तरुणीची मानसिक स्थिती योग्य नसावी असं वाटतं. पण त्यानंतर तरुणी जेव्हा या सुटकेसमध्ये आईचा मृतदेह आहे सांगते तेव्हा मात्र पोलीस खाडकन जागे होतात. 

पोलीस जेव्हा तरुणीला बॅग खोलून दाखवण्यास सांगतात तेव्हा त्यात खऱोखर एका वयस्कर महिलेचा मृतदेह असतो. यानंतर मात्र पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकते. 

या बॅगेत एका वयस्कर व्यक्तीचा फोटोही असतो. सोनम हा आपल्या वडिलांचा फोटो असल्याची माहिती पोलिसांना देते. सोनाली पोलिसांना सांगते की, माझी आई मला वारंवार मारुन टाका सांगत होती. यामुळेच मी तिची हत्या केली. हे ऐकल्यानंतर पोलिसांचा विश्वासच बसत नव्हता. यानंतर त्यांनी तिला खुर्चीवर बसण्याची विनंती करत सगळं सविस्तर सांगण्यास सांगितलं. 

महिलेने पोलिसांना सांगितलं की, ती पश्चिम बंगालची राहणारी आहे. तिचं वय 39 आहे. आपण आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहोत. लग्नानंतर मी पतीसह बंगळुरुत शिफ्ट झाली होती. सासरी माझा पती आणि सासू आहेत. आई-वडील कोलकात्यात राहतात. काही वर्षांपूर्वा आजारामुळे वडिलांचं निधन झालं. यानंतर आपली आई एकटी पडली होती. आईची काळजी घेण्यासाठी कोणीच नव्हतं. यामुळे मी आईला बंगळुरुत बोलावून घेतलं होतं. पहिले काही दिवस सर्व काही ठीक होती. पण नंतर आई आणि सासूमध्ये भांडण होऊ लागलं होतं. दोघींचं अजिबात पटत नव्हतं. 

रोजच्या भांडणाला कंटाळून सोनालीने नोकरी सोडली होती. यानंतर भांडणं कमी होतील असं तिला वाटत होतं. पण यानंतरही भांडणं सुरु होतीच. रविवारी छोट्या कारणावरुन दोघींमध्ये वाद झाला. यानंतर सोनाली आणि पतीने त्या दोघींना शांत केलं होतं. 

सोनाली शांत करताना तिची आई म्हणाली की, 'तू मला मारुन टाक. तेव्हाच ही भांडणं संपतील आणि आयुष्य नीट होईल'. सोनालीने आईला असं बोलू नको असं समजावलं. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा आई आणि सासूत भांडण सुरु झालं. पती घरी नसल्याने सोनाली भांडणं सोडवत होती. यानंतर तिने सासूला दुसऱ्या खोलीत जाण्यास सांगितलं. यावेळी तिची आई पुन्हा सगळं तेच बोलू लागली होती. यानंतर सोनालीने आईला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि आता तू मेल्यानंतरच सगळं काही नीट होईल असं म्हटलं. तिच्या आईनेही विरोध केला नाही आणि गोळ्या खाल्ल्या. पण गोळ्या खाल्ल्याने त्यांची तब्येत बिघडली. आईचा त्रास पाहवत नसल्याने सोनालीने आईचा गळा दाबून मारुन टाकलं. 

दरम्यान याबद्दल आपला पती आणि सासू यांना काहीच माहिती नसल्याचा दावा सोनालीने केला आहे. सोनालीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तिला अटक केली. पोलीस तिची चौकशी करत आहेत. तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.