कारखालून ठिणग्या उडत असतानाही चालक थांबला नाही, नंतर पाहिलं तर खाली....; रस्त्यावर नागरिकांची एकच धावपळ

गुजरातच्या (Gujarat) सूरतमध्ये (Surat) एक भीषण अपघात झाला आहे. कारचालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली. यानंतर दुचाकी कारच्या खाली अडकलेली असतानाही चालकाने कार थांबवली नाही. जवळपास 800 मीटपर्यंत त्याने बाईकला फरफटत नेलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 12, 2023, 10:24 AM IST
कारखालून ठिणग्या उडत असतानाही चालक थांबला नाही, नंतर पाहिलं तर खाली....; रस्त्यावर नागरिकांची एकच धावपळ title=

गुजरातच्या (Gujarat) सूरतमध्ये (Surat) हिट अँड रनची एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. डिंडोली क्षेत्रात एक कार आणि दुचाकी यांच्यात धडक झाली. यानंतर दुचाकी कारच्या खाली आली आणि तशीच अडकली. पण यानंतरही चालकाने कार थांबवली नाही. त्याने 800 मीटरपर्यंत दुचाकी फरफटत नेली. सुदैवाने कारने धडक दिल्यानंतर चालक दूर फेकला गेला होता. यामुळे त्याची जीव वाचला. पण चालक दुचाकी फरफटत नेत असल्याचं पाहून रस्त्यावर उभे नागरिक आश्चर्याने पाहत होते. यातील काहीजण कारच्या दिशेने धावतही सुटले होते. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. 

गुरुवारी रात्री 8 वाजता ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे त्यानुसार, एक ग्रे रंगाची ब्रेझा कार रस्त्यावर वेगाने धावत आहे. यादरम्यान कारच्या चाकाखालून ठिणग्या उडताना दिसत आहेत. जवळपास 800 मीटपर्यंत लोकांना हे चित्र पाहायला मिळालं. 

दुचाकी अडकलेली असतानाही चालकाने थांबवली नाही कार

कारच्या खाली दुचाकी अडकलेली असतानाही चालकाने कार थांबवली नसल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणीही तक्रार दिलेली नाही. पण घटनेची माहिती मिळाल्यानंतर डिंडोली पोलीस ठाण्याची पीसीआर व्हॅन घटनास्थळी दाखल झाली होती. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. पण त्यानेही पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. धडकेनंतर आपण लांब जाऊन पडलो होतो, त्यामुळे या जखमा झाल्याचं दुचाकीस्वाराने सांगितलं आहे. 

पुण्यात कारचालकाने 7 वर्षांच्या मुलाला नेलं फरफटत

पिंपरी चिंचवडमध्ये चाऱ्होली चौकातून दिघीच्या दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या आई आणि तिच्या मुलाला एका मद्यपी वाहनचालकाने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात आई गंभीर जखमी झाली, तर 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. संतापजनक बाब म्हणजे वाहन चालक एवढा मद्यधुंद अवस्थेत (Drunk Driver) होता की त्याने गाडीला अडकलेल्या त्या चिमुकल्याला 700 ते 800 मीटर अंतर फरफटत नेलं. नागरिकांनी चालकाला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार पार्थ प्रणव भोसले (Parth Bhosle)  हा 7 वर्षांचा मुलगा त्याच्या आई बरोबर गुरुवारी रात्री चाऱ्होली कडून दिघीकडे दुचाकी वरून जात होता. त्याच वेळी मद्यपी कारचालक राहुल तापकीर (Rahul Tapkir) याने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरुन आई खाली पडली. तर पार्थ हा कारच्या खाली अडकला गेला. पण आरोपी राहुल तापकीरला याची कल्पनाच नव्हती. त्याने पार्थला काही मीटर फरफटत नेलं. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पार्थचा मृत्यू झाला. 

आरोपी राहुल तापकीर याने आणखी काही वाहनांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी राहुल तापकिर हा दारु प्यायला होता. त्यामुळे स्कुटीला धडक दिल्याचं त्याला कळलच नाही. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर लोकांनी त्याची कार अडवली. दिघी पोलिसांनी (Dighi Police) तापकीर याला अटक केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.