Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) प्री-वेडिंग पार्टीत एका व्यावसायिकाने तरुणाला फाईव्ह स्टार हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा तरुण त्याच्या मुलाचा मित्र होता. रविवारी झालेली ही घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही आता सोशल मीडियावरही व्हायरल झालं आहे. ज्या तरुणाला व्यावसायिकाने मारहाण केली, तो घटनेच्या आधी त्यांच्या पाया पडताना दिसत आहे. पण पुढच्याच क्षणी व्यावसायिक त्याला निर्दयीपणे मारहाण सुरु करतो.
सार्थक अग्रवाल असं तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो आरोग्य क्षेत्रात व्यावसायिक आहे. गच्चीवरुन खाली पडल्यानंतर तो गंभीर जखमी झाला असून, त्याला मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आपल्या मित्राच्या लग्नाचं सेलिब्रेशन करण्यासाठी तो हॉटेलात गेला होता.
एका क्षणी सार्थक आणि त्याचा मित्र रिदीम अरोरा यांच्यात भांडण सुरु झालं. पहाटे 2 वाजता त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यानंतर रिदीमने आपले वडील संजीव अरोरा यांना फोन करुन हॉटेलमध्ये बोलावलं. संजीव अरोरा हे कपडा व्यापारी आहेत.
'Five-Star Chaos' - Man Charged After Pushing Guest Off Hotel Terrace In Uttar Pradesh
The pre-wedding party in a swanky UP hotel became a crime scene after a guest was caught on CCTV attacking and shoving another off the raised terrace.
The victim, currently in a Bareilly… pic.twitter.com/Oa3t5TjJ85
— RT_India (@RT_India_news) April 22, 2024
सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार, संजीव अरोरा तिथे पोहोचण्याआधी दोन गट आपापसात वाद घालत होते. संजीव अरोरा तिथे येताच सार्थक अग्रवाल त्यांच्या पाया पडतो आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण संजीव अरोरा अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी थेट सार्थकची कॉलर पकडली आणि कानाखाली मारण्यास सुरुवात केली. कॉलर पकडून त्यांनी त्याला थेट गच्चीच्या कडेला नेलं आणि खाली ढकलून दिलं. हे पाहिल्यानंतर तिथे उपस्थित काहीजण सार्थकला पाहण्यासाठी खाली धाव घेतात.
पण इतकं होऊनही संजीव अरोरा थांबत नाहीत. ते दुसऱ्या तरुणाकडे वळतात आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात करतात. यावेळी एक व्यक्ती त्यांना सतत रोखण्याचा प्रयत्न करत असतो.
दरम्यान सार्थक अग्रवालचे वडील संजय अग्रवाल यांनी हे लोक कोण आहेत याची आपल्याला कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. 'माझ्या मुलाला किंवा मला हे लोक कोण आहेत माहिती नाही,' असं ते म्हणाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आरोपी दारूच्या नशेत होते आणि त्यांनी कोणतीही चिथावणी दिली नसता हल्ला केला असं एफआयआरमध्ये लिहिलं आहे. पोलिसांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर हानी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.