क्लीन बोल्ड करणाऱ्या गोलंदाजाची निर्घृण हत्या; बॅट्समनने पिचवर आधी बेदम मारलं, नंतर गळा दाबून केलं ठार

Crime News: क्लीन बोल्ड केल्याने फलंदाजाने गोलंदाजाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फलंदाजाने आधी गोलंदाजाला पिचवरच मारहाण केली आणि नंतर गळा दाबला. यानंतर आरोपीने पळ काढला.   

शिवराज यादव | Updated: Jun 20, 2023, 04:16 PM IST
क्लीन बोल्ड करणाऱ्या गोलंदाजाची निर्घृण हत्या; बॅट्समनने पिचवर आधी बेदम मारलं, नंतर गळा दाबून केलं ठार title=

Crime News: कानपूरमध्ये (Kanpur) क्रिकेट (Cricket) खेळणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. गोलंदाजी करताना त्याने क्लीन बोल्ड केल्याने फलंदाजाने त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. त्याने सर्वात आधी गोलंदाजाला पिचवरच मारहाण केली. यानंतर त्याने त्याचा गळा दाबून ठार केलं. यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी त्याला घेऊन रुग्णालयात धाव घेतली होती. पण डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. 

तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मृतदेह घराबाहेर ठेवत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी कुटुंबीयांची समजूत काढत त्यांना शांत केलं. अखेर रात्री 10 वाजता पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. 

आधी वाद नंतर मारहाण

सचिन असं मृत 14 वर्षीय मुलाचं नाव आहे. तो मजुरीचं काम करायचा. सोमवारी संध्याकाळी 5 वाजता काही मुलांसह तो गावाबाहेरील चकरोड येथे क्रिकेट खेळत होता. शेजारी राहणारा हरगोविंद फलंदाजी करत असताना सचिन गोलंदाजी करत होता. यावेळी सचिनने हरगोविंदला क्लीन बोल्ड केलं. 

बाद झाल्यानंतर हरगोविंद फलंदाजी सोडण्यास तयार नव्हता. यावरुन सचिन आणि हरगोविंज यांच्यात शाब्दिक वाद झाला. नंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. इतर मुलांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला पण दोघेही ऐकण्यास तयार नव्हते. याचवेळी हरगोविंदचा भाऊ ब्रजेशदेखील तिथे पोहोचला. दोघांनी मिळून मैदानावरच सचिनला मारहाण सुरु केली. यानंतर गळा दाबून त्याची हत्या केली. 

सचिनचे वडील मोहन सिंह यांनी सांगितलं की, "मुलाच्या मित्राने फोन करुन सचिन मैदानात बेशुद्ध पडला असल्याचं सांगितलं. यानंतर आम्ही धावत तिथे पोहोचलो. सचिनला रुग्णालयात घेऊन गेलो. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. यानंतर आम्ही सचिनच्या मित्रांशी बोललो. त्यानंतर आम्हाला मैदानात झालेल्या मारहाणीची माहिती मिळाली. हरगोविंदने सचिनची गळा दाबून हत्या केल्याचं त्यांनी सांगितलं".

पोलिसांकडून कारवाईचं आश्वासन

कुटुंबीय 7 वाजण्याच्या सुमारास मृतदेह घेऊन घरी पोहोचले होते. यानंतर दन्ही आरोपींच्या अटकेसाठी कुटुंबीयांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी मृतदेह घराबाहेरच ठेवला होता. आरोपींवर कारवाई केल्यानंतरच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवू असं त्यांचं म्हणणं होतं. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर अखेर ते शांत झाले. रात्री 10 वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 

3 वर्षांपूर्वी सचिनच्या काकीची झाली होती हत्या

ग्रामस्थांनी सांगितलं की, हरगोविंदला जीमची आवड आहे. गावात सर्वांना आपली शरीरयष्टी दाखवत तो नेहमी रुबाब दाखवतो. तीन वर्षांपूर्वी सचिनची काकू कमला हिची हरगोविंदच्या कुटुंबाने मारहाण करत हत्या केली होती.