7th Pay Commission : आगामी निवडणुकांच्या धर्तीवर सध्या केंद्र सरकार काही मोठे निर्णय घेताना दिसत आहे. समाजातील सर्व घटकांवर प्रभाव पाडत, मताधिक्यासाठी अनेक गोष्टी हाती घेणाऱ्या याच केंद्र सरकारच्या वतीनं आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा थेट फायदा देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
गुरुवारी केंद्र शासनाच्या वतीनं Central Government Employees साठी महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला असून, आता हा आकडा 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. जिथं 1 जानेवारी 2024 पासून 30 जून 2024 पर्यंत महागाई भत्ता वाढवल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
पीयूष गोयल यांनी यासंदर्भात माहिती देताना हाऊस रेंट अलाऊंन्स अर्थात एचआरएमध्येही वाढ केल्याचं स्पष्ट केलं. जिथं आधी 27, 18 आणि 9 टक्के एचआरए मिळत होता तिथं आता वाढ करण्यात आली असून एकूण आकडा 30 टक्के, 20 टक्के आणि 10 टक्के इतका करण्यात आला आहे. केंद्राच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या इतर सुविधांमध्येही 25 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं.
निवडणुकांआधी घेण्यात आलेल्या या मोठ्या निर्णयामुळं आता 24400 कोटी रुपयांच्या या रकमेचा फायदा केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मिळणार आहे. केंद्रानं घेतलेल्या कैक निर्णयामध्ये कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीमध्येही वाढ करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या या पगारवाढीच्या निर्णयाचा फायदा जवळपास 49 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्याशिवाय यामध्ये 68 लाख निवृत्तीवेधनधारकांचासाही समावेश असेल. मार्च महिन्याच्या पगारामध्ये कर्मचाऱ्यांना ही वाढीव रक्कम मिळणार असून, मागील दोन महिन्यांचे एरियरही त्यांना मिळणार आहेत. त्यामुळं मार्च महिन्याच्या पगाराची रक्कम नेहमीपेक्षा जास्त असणार यात शंका नाही.