Central Government Women's Day Gift Announced by PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला दिनानिमित्त सर्व भारतीय महिलांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. आमच्या सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
मोदींनी आपल्या अधिकृत एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. "आजच्या महिलादिनी आमच्या सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील कोट्यवधी घरांवरील आर्थिक बोजा कमी होणार आहे. खास करुन याचा फायदा आपल्या नारीशक्तीला होणार आहे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
"स्वयंपाकाचा गॅस अधिक परवडणाऱ्या दरांमध्ये देऊन आम्ही कुटुंबांच्या उत्तम विकासाठी आणि आरोग्यदायक वातावरणासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. महिला सबलीकरणाच्या आमच्या धोरणांशी या निर्णय साम्य साधणारा आहे. त्यांना सुखाने जगता यावं यासाठी हा निर्णय पूरक आहे," असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
Today, on Women's Day, our Government has decided to reduce LPG cylinder prices by Rs. 100. This will significantly ease the financial burden on millions of households across the country, especially benefiting our Nari Shakti.
By making cooking gas more affordable, we also aim…
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024
गुरुवारीच केंद्रीय मंत्रीमंडळाने उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅश सिलिंडरवरील 300 रुपयांच्या अनुदानाला आणखी एका वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या योजनेतील लाभार्थींसाठी 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदानामध्ये गेल्या वर्षा ऑक्टोबरमध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती. लाभार्थींना वर्षभरात 12 सिलिंडर अनुदानित किमतीमध्ये मिळतील. या निर्णयामध्ये केंद्र सरकारला 12 हजार कोटींचा अतिरिक्त खर्च करावा लागेल.
2 दिवसांपूर्वीच महानगर गॅस लिमिटेडने मुंबईकरांना मध्यरात्री मोठं सप्राइज दिलं होतं. मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यरात्री अचानक सीएनजीचे दर कमी करण्यात आले. मंगळवारी रात्री उशीरा एमजीएलने सीएनजीच्या दरांमध्ये कापत करत असल्याची घोषणा केली. तात्काळ प्रभावाने नवीन दर लागू होतील असंही कंपनीने सांगितलं. नवीन दरानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 2.50 रुपयांनी कमी झाले. मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील असं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं. नवीन दरानुसार मुंबईतील सीएनजीचे दर प्रति किलो 73.40 रुपये इतका झाला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा विचार केल्यास नव्या दरकपातीमुळे सीएनजी हा पेट्रोल आणि डिझेलपेक्षा 53 टक्के अधिक स्वस्त आहे. सध्याचे मुंबईतील पेट्रोल, डिझेलचे दर मागील अनेक महिन्यांपासून 105 ते 110 रुपयांदरम्यान आहेत. सीएनजीचे दर कमी झाल्याने वाहतुकीसाठी सीएनजीचा वापर वाढण्याची अपेक्षा आहे. प्रामुख्याने वाहनांमधील इंधनासाठी सीएनजीचा वापर वाढवण्याचा प्रयत्न म्हणून ही दरकपात करण्यात आल्याची चर्चा आहे. सीएनजी हे इंधन म्हणून पेट्रोल, डिझेलपेक्षा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. भारताला अधिक हरित आणि स्वच्छ बनवण्याच्या उद्देशाने आम्ही सीएनजीचे दर कमी करत असल्याचं महानगर गॅस लिमिटेडने दरकपात करताना जाहीर केलं.
मुंबईत पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिकच आहेत. पेट्रोलचे आजचे म्हणजेच 8 मार्चचा दर हा 106.31 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर एक लिटर डिझेलसाठी 94.27 रुपये मोजावे लागत आहेत. हे दर मुंबईमधील आहेत.